Pakistan, IND vs NZ: "टीम इंडियाकडून काही तरी शिका..."; Babar Azam वर संतापला पाकिस्तानी माजी क्रिकेटर

भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानात जळफळाट

Pakistan, IND vs NZ: टीम इंडियाने वन डे मालिकेत न्यूझीलंडला पराभूत केले. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी अजिंक्य आघाडी घेत दमदार कामगिरी केली. आता या मालिकेत भारत न्यूझीलंडला क्लीन स्वीप देण्याच्या तयारीत आहे.

दुसऱ्या वन डे मध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानात मात्र भारताचा हा विजय रूचला नाही. या मालिकेच्या निमित्ताने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने आपल्याच संघाचा कर्णधार बाबर आझमवर निशाणा साधला.

नुकतेच न्यूझीलंडने पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले होते. त्याचाच आधार घेत दानिश कनेरियाने त्याच्या यूट्यूब चॅनलवरून पाकिस्तानी संघावर जोरदार टीका केली आणि त्याचा राग बॅटिंग युनिटवरही काढला.

दानिश कनेरिया म्हणाला, "पाकिस्तानला आपल्या टी२० कर्णधारपदाबाबत विचार करावा लागेल. जर बाबर आझमकडून कर्णधारपद घेतले तर त्यासाठी कोणाची वर्णी लावता येईल याचाही विचार करावा लागेल. जर आपण पाकिस्तानची वन डे सामन्यातील कामगिरीबद्दल बोललो, तर कोणीही खूप चांगली कामगिरी केली नाही किंवा सामनाही जिंकलेला नाही."

"आम्ही आमच्याच खेळपट्ट्यांवर पाहुण्या संघाकडून मार खात होतो. समोरचा संघ आमच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई करत होता. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे मात्र कौतुकच केले पाहिजे. भारताने आपल्या घरच्या स्थितीचा सर्वोत्तम फायदा घेतला. भारतीय संघाला शेवटच्या सामन्यात त्यांची बेंच स्ट्रेंथ पाहण्याची संधी आहे, त्यामुळे पुढील तयारीवर भर दिला जाईल हे नक्की."

"पाकिस्तानमध्ये असे घडत नाही कारण इथे प्रत्येकजण स्वतःचा विचार करतो आणि संघाला काही फायदा होत नाही. पाकिस्तानचा संघ गेल्या काही काळापासून स्वत:च्या घरात चांगली कामगिरी करू शकलेला नाही. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या संघांनी पाकिस्तानात येऊन वन डे, टी२० आणि कसोटी मालिकेत पाकिस्तानचा पराभव केला," अशा शब्दांत कनेरियाने पाक संघावर टीका केली.