रोहित शर्मा सर्वकाही विसरेल पण...; माजी प्रशिक्षकांनी सांगितली विसरळभोळ्या हिटमॅनची Inside स्टोरी

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी रोहितच्या खेळीचे आणि नेतृत्व कौशल्याचे कौतुक केले

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब जिंकला. विश्वचषक जिंकताच रोहित, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने ट्वेंटी-२० क्रिकेटला रामराम केले.

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी रोहितच्या खेळीचे आणि नेतृत्व कौशल्याचे कौतुक केले. विश्वचषकानंतर राठोड यांचा कार्यकाळ संपला. एका पॉडकास्टमध्ये त्यांनी रोहितच्या कर्णधारपदाबद्दल चर्चा केली. पॉडकास्टमध्ये रोहितच्या फलंदाजी आणि कर्णधारपदाच्या गुणांवर प्रकाश टाकण्यासोबतच त्याच्या काही उणिवाही त्यांनी बोलून दाखवल्या.

विक्रम राठोड म्हणतात की, नाणेफेक झाल्यावर फलंदाजी करायची की गोलंदाजी करायची हा निर्णय रोहित विसरू शकतो. नाणेफेकीच्या वेळी तो खेळाडूंची नावेही विसरतो. अनेकवेळा तो संघाच्या बसमध्ये त्याचा फोन आणि आयपॅड विसरलाही आहे, पण त्याचा गेम प्लॅन तो कधीच विसरत नाही. रोहित यात खूप चांगला आहे आणि तो एक चांगला रणनीतिकार आहे.

रोहितचा पहिला गुण म्हणजे तो फलंदाज म्हणून उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याला त्याचा खेळ चांगला समजतो. त्याच्याकडे नेहमीच एक स्पष्ट गेम प्लॅन असतो. कर्णधाराने लीडर म्हणून आपल्या कामगिरीद्वारे संघातील इतर खेळाडूंसमोर आदर्श निर्माण करणे आवश्यक असते. कर्णधार बनल्यानंतर रोहित आपल्या चांगल्या कामगिरीमुळे खेळाडूंसमोर आदर्श ठेवण्यात यशस्वी ठरला आहे, असेही त्यांनी सांगितले.

विक्रम राठोड पुढे म्हणाले की, रोहित इतर सहकारी खेळाडूंसोबत वेळ घालवत असतो. मी कोणत्याही कर्णधाराला संघाच्या बैठकांमध्ये किंवा रणनीतीमध्ये इतका गुंतलेला पाहिला नाही. तो संघाची रणनीती ठरवण्यावर बराच वेळ घालवतो.

तसेच रोहित कर्णधार म्हणून रणनीती बनवण्यात माहीर आहे. अनेकवेळा तो मैदानावर असे निर्णय घेतो की सर्वांना आश्चर्य वाटते. पण त्याच्या या निर्णयामागील खरे कारण नंतर कळते. बाहेर बसलेला प्रशिक्षक म्हणूनही हे मला आश्चर्यचकित करते, असेही त्यांनी नमूद केले.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला. गेल्या वर्षी भारतात झालेल्या वन डे विश्वचषकात संघाने अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. पण, भारताचा विजयरथ रोखून ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन होण्याचा मान पटकावला.

याआधी रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरीही गाठली होती. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले.

भारताने १७ वर्षांनंतर ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला. याआधी टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात २००७ मध्ये पहिला ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला होता.