सूर्यकुमार यादवनं आंतरराष्ट्रीय श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये अप्रतिम खेळ दाखवला. सूर्याने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 112 धावांची तुफान खेळीही खेळली. त्याच्या खेळीमुळे भारताने हा सामना 91 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली. टी-20 नंतर आता एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. 10 जानेवारी रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाईल.
श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका जिंकूनही टीम इंडियासाठी सर्व काही ठीक आहे असे म्हणता येणार नाही. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत सूर् कुमार यादव वगळता एकाही आघाडीच्या फलंदाजाला तेवढे योगदान देता आले नाही. त्याचबरोबर गोलंदाजीतही काही खेळाडूंची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही.
आता टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि सिलेक्टर सबा करीम यांनी भारतीय संघाला इशारा दिला आहे. टी-20 मध्ये यश मिळवण्यासाठी भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीवर जास्त अवलंबून राहू शकत नाही, असे मत सबा करीम यांनी मांडले.
सबा करीम यांनी भारतीय फलंदाजांना एकजुटीने कामगिरी करण्याचे आवाहन केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सबा करीम म्हणाले, 'भारतीय संघ सूर्यकुमार यादववर जास्त अवलंबून राहू शकत नाही. अशा स्थितीत आगामी सामन्यांमध्ये संघासाठी त्रासदायक ठरणार आहे.’
इतर फलंदाजांनीही महत्त्वाचे योगदान द्यावे अशी माझी इच्छा आहे. सूर्यकुमार वगळता बाकीच्या फलंदाजांनी थोडेफार योगदान दिले आहे. असे असले तरी सामना जिंकवणारी कामगिरी दिसत नाही, असेही ते म्हणाले.
राहुल त्रिपाठीला T20 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर अधिक संधी मिळायला हव्यात. राहुल त्रिपाठीने इंडियन प्रीमियर लीगमध्येही त्या क्रमांकावर फलंदाजी करताना चमकदार कामगिरी केली आहे, असे त्यांनी नमूद केले.
'राहुल त्रिपाठीसाठी क्रमांक-3 हे एक चांगले स्थान आहे. याच स्थानावर त्यानं आयपीएलमध्येही फलंदाजी केली आणि चांगल्या धावाही केल्या. आघाडीच्या फळीतील फलंदाजांना अशा कामगिरीची गरज असल्याचे स्पष्ट मतही करीम यांनी व्यक्त केलं.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या. सूर्याने तीन सामन्यांमध्ये 85.00 च्या उत्कृष्ट सरासरीने आणि 175.25 च्या स्ट्राइक रेटने 170 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक शतक आणि एक अर्धशतक झळकले. अक्षर पटेल 117 धावांसह मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर होता. या दोघांशिवाय या मालिकेत एकाही भारतीय फलंदाजाला ६० धावाही करता आल्या नाहीत.