रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?

सध्या IPL चा सीझन सुरू आहे. वेगवेगळ्या क्रिकेट संघात मराठमोळे क्रिकेटपटू खेळताना दिसतात. अंजिक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर तसेच नुकताच आलेला आयुष म्हात्रे यासारखे खेळाडू त्यांचं कौशल्य मैदानात दाखवत आहे. परंतु याचसोबत आणखी एक मराठमोळा चेहरा क्रिकेटच्या पिचवर उभा असल्याचं पाहायला मिळतो.

हा चेहरा आहे सोलापूरच्या अनिश सहस्त्रबुद्धे यांचा...रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर हा त्यांचा अफलातून करणारा प्रवास सगळ्यांनाच थक्क करणारा आहे. मोटिवेशनल स्पीकर असलेले अनिश हे बीसीसीआयमध्ये अंपायरचीही भूमिका साकारतात. सध्याच्या आयपीएलमध्ये अनिश विविध सामन्यात पंच म्हणून काम करत आहेत

अनिश यांचे वडील कॅटेरिंगचा व्यवसाय करत होते. गिरण्या बंद झाल्यानंतर अनिशच्या वडिलांना हा व्यवसाय उभा केला. बाबांच्या व्यवहार ज्ञानातून पुढे शिकत स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी अनिश यांनी उभी केली. एका ठिकाणी नोकरी न करता स्वत: काहीतरी बनायचं हे अनिश यांनी ठरवून ठेवले होते.

सुरुवातीच्या काळात अनिश सहस्त्रबुद्धे यांनी ९ महिने बार टेंडर म्हणून काम केले. मात्र घरात दारूला आजपर्यंत कुणी स्पर्श केला नाही. बार टेंडर म्हणून काम केले तरीही अनिश यांना दारूचे व्यसन कधी लागले नाही. स्वत:चं आयुष्य स्वत:चे घडवायचे असते असं अनिश कायम इतरांना सांगत असतात.

अनिश यांनी वयाच्या १५ वर्षीपासून पंच म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पंच परीक्षा उत्तीर्ण होत ते बीसीसीआयमध्ये अंपायर झाले. गेल्या २२ वर्षापासून ते पंच म्हणून काम करत आहेत. अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय पातळीवरील सामन्यात त्यांनी पंचाची भूमिका निभावली. स्वत:चा व्यवसाय करत अनिश यांनी क्रिकेटचे वेडही जपले.

१४ फेब्रुवारी १९८७ साली सोलापूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात अनिश यांचा जन्म झाला. लहानपणापासून जेवण बनवण्याची आवड असल्याने एका स्टार हॉटेलमध्ये अनिश यांनी शेफ म्हणून काम केले. हे सर्व करत असताना क्रिकेटमध्येही त्यांनी करिअर उभारले.

स्टंम्पमागे उभं राहून अंपायर इतक्या झटपट कसे निर्णय देतात याबाबत अनिश यांना कायम उत्सुकता असायची. त्यातूनच त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षीय अंपायरची परीक्षा उत्तीर्ण केली.