Join us  

PAK vs NZ: "आईला दिलेले वचन पूर्ण केलं, पण ती आज नाही...", पाकिस्तानचा 'मॅचविनर' नसीम शाह भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 11:08 AM

Open in App
1 / 11

सध्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. पाकिस्तानी संघ मायदेशात किवी संघाविरूद्ध 3 सामन्यांची वन डे मालिका खेळत आहे. सोमवारी झालेला मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान संघाने विजयी सलामी दिली आहे.

2 / 11

प्रतिष्ठित मालिकेतील पहिला सामना 9 जानेवारी रोजी कराची येथे खेळला गेला, जिथे यजमानांनी 11 चेंडू आणि सहा गडी राखून विजय मिळवला. सामन्याचा हिरो युवा वेगवान गोलंदाज नसीम शाह ठरला.

3 / 11

नसीम शाहने 10 षटकांत 57 धावा देऊन सर्वाधिक पाच बळी पटकावले. डेव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसव्हेल, मिचेल सँटनर आणि हेन्री शिपली यांना नसीमने बाहेरचा रस्ता दाखवला.

4 / 11

कराचीत त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी युवा स्टार वेगवान गोलंदाजाला 'सामनावीर' म्हणून घोषित करण्यात आले. सामना संपल्यानंतर त्याने एक भावनिक विधान केले, जे ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले.

5 / 11

यादरम्यान नसीम शाहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये त्याने आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिल्याचे पाहायला मिळत आहे. जेव्हा त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा त्याच्या आईला क्रिकेटबद्दल फारशी माहिती नव्हती.

6 / 11

नसीम शाहने सांगितले की, 'मी माझ्या आईला वचन दिले होते की जेव्हा जेव्हा मला पाच पाच विकेट्स मिळतील तेव्हा मी ते टीव्हीसमोर तुला समर्पित करीन. यामुळे तुला खूप आनंद होईल.'

7 / 11

'मात्र, दुर्दैवाने ती पाहू शकत नाही, पण प्रत्येक क्षणी, प्रत्येक सेकंदात ती माझ्या मनात असते. जेव्हा मी चांगला खेळतो तेव्हा मला वाटते की माझी आई माझ्याकडे पाहत आहे. त्यामुळे मला धैर्य मिळते', असे नसीम शाहने अधिक म्हटले.

8 / 11

पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला आणि किवी संघाला 50 षटकांत 255 धावांवर रोखले.

9 / 11

पाकिस्तानकडून नसीम शाहने सर्वाधिक 5 बळी पटकावले. उसामा मीरने 2 बळी घेतले, तर मोहम्मद वसीम आणि मोहम्मद नवाज यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. न्यूझीलंडकडून टॉम लॅथम (42) आणि मायकेल ब्रेसव्हेल (43) वगळता कोणत्याच फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही.

10 / 11

न्यूझीलंडने दिलेल्या 256 धावांचा पाठलाग पाकिस्तानने सहज केला. यजमान संघाने सांघिक खेळीच्या जोरावर 6 गडी आणि 11 चेंडू राखून विजय मिळवला. मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 77 धावांची नाबाद खेळी करून विजयावर शिक्कामोर्तब केला.

11 / 11

तर बाबर आझम (66), फखर झमान (56)) आणि हारिस सोहेल (32) धावा करून बाद झाला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आपली छाप सोडण्यात अपयश आले. मायकेल ब्रेसव्हेलने सर्वाधिक 2 बळी घेतले, तर टीम साउदी आणि ग्लेन फिलिप्स यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.

टॅग्स :पाकिस्तानन्यूझीलंडबाबर आजमकेन विल्यमसनप्रेरणादायक गोष्टी
Open in App