Join us  

Gautam Gambhir: "त्याला कसोटी क्रिकेटमध्ये घेण्याची वेळ आले", 'सूर्या'चे कौतुक करताना गौतम गंभीरचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 10:19 AM

Open in App
1 / 12

भारतीय संघाने शनिवारी झालेल्या अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवून पाहुण्या श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. मालिकेतील पहिला सामना भारताने तर दुसरा सामना श्रीलंकेने जिंकला होता. मात्र, अखेरच्या सामन्यात विजय मिळवून हार्दिक सेनेने विजयरथ कायम ठेवला आहे.

2 / 12

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताच्या 'यंग ब्रिगेड'ने तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात श्रीलंकेच्या संघाला 91 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले आणि मालिका 2-1 ने जिंकली.

3 / 12

सूर्यकुमार यादवने केलेली 112 धावांची नाबाद खेळी आणि त्याला भारतीय गोलंदाजांची मिळाली शिस्तबद्ध साथ यांच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत केले. भारतात श्रीलंकेने आतापर्यंत कधीही ट्वेंटी-20 मालिका जिंकलेली नाही, त्यामुळे हार्दिकच्या नव्या दमाच्या संघाने ही परंपरा कायम ठेवत भारताचा विजय निश्चित केला.

4 / 12

शानदार शतकी खेळीमुळे सूर्यकुमार यादवला सामनावीर घोषित करण्यात आले. सूर्याने केवळ 51 चेंडूत 112 धावांची नाबाद शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत 9 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता.

5 / 12

सूर्यकुमार यादवच्या शनिवारच्या खेळीने सर्वांची मनं जिंकली. अशातच भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने सूर्याला कसोटी क्रिकेटमध्ये खेळवायला हवे असे मत व्यक्त केले.

6 / 12

गौतम गंभीरने सोशल मीडियावर एक पोस्ट करून सूर्याचे कौतुक केले. 'काय खेळी @surya_14kumar त्याला कसोटी क्रिकेटमध्ये उतरवण्याची वेळ आली आहे', अशा शब्दांत गंभीरने सूर्याला कसोटीत खेळवायला हवे अशी इच्छा व्यक्त केली.

7 / 12

अखेरच्या सामन्यात नाणेफेक जिंकून हार्दिकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ईशान किशन पहिल्याच षटकात बाद झाला. पण त्यानंतर राहुल त्रिपाठीने 16 चेंडूत तुफानी 35 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने दमदार खेळी केली. शुबमन गिलअर्धशतकाच्या जवळ पोहोचला पण 44 धावांवर बाद झाला.

8 / 12

त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या (4) आणि दीपक हु़ड्डा (4) स्वस्तात बाद झाले. हे दोघे गेल्यावर अक्षर पटेलने सूर्यकुमारला चांगली साथ दिली. सूर्यकुमारने तुफान फटकेबाजी करत 45 चेंडूत शतक ठोकले. हे सूर्याचे तिसरे आणि भारतीय फलंदाजाकडून यंदाच्या वर्षातील पहिले ट्वेंटी-20 शतक ठरले.

9 / 12

सू्र्याने 7 चौकार आणि 9 षटकारांच्या साथीने नाबाद 112 धावा चोपल्या. अक्षर पटेलनेही 9 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 21 धावा करत संघाला 228 धावांपर्यंत पोहोचवले. भारतीय संघाने दिलेल्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला पूर्णपणे अपयश आले.

10 / 12

229 धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. त्यानंतर त्यांना सावरताच आले नाही. पाथुम निसांका 15 धावांवर बाद झाला. कुसल मेंडिस देखील 23 धावा काढून माघारी परतला. या दोंघाच्या बाद होण्यानंतर श्रीलंकेच्या डावाल गळतीच लागली.

11 / 12

अविष्का फर्नांडो 1 धाव काढून बाद झाला. धनंजय डिसिल्वाने 22, चरिथ असालांकाने 19, दासुन शनाकाने 23 धावा करत संघर्ष करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. हसरंगा 9 धावांवर , करूणरत्ने शून्यावर, महेश तिक्ष्णा 2 धावांवर तर मदुशंकाने 1 धाव काढून बाद झाला. त्यामुळे भारताने 91 धावांनी सामना जिंकला.

12 / 12

भारताकडून अर्शदिप सिंगने सर्वाधिक 3 बळी पटकावले. कर्णधार हार्दिक पांड्या, उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले, तर अक्षर पटेलला 1 बळी घेण्यात यश आले.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकासूर्यकुमार अशोक यादवगौतम गंभीरहार्दिक पांड्याअर्शदीप सिंग
Open in App