Join us  

Gautam Gambhir on Dinesh Karthik : गौतम गंभीरला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात दिनेश कार्तिक नकोय; जाणून घ्या त्यामागचं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 4:43 PM

Open in App
1 / 7

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाकडून खेळताना दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) उल्लेखनीय कामगिरी करून टीम इंडियाच्या निवड समितीला पुन्हा एकदा त्याचा विचार करण्यास भाग पाडले. त्यामुळेच सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून त्याने २०१९नंतर टीम इंडियात पुनरागमन केले.

2 / 7

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप साठी कार्तिक संघात हवा, अशी मागणी अनेकजणं करत आहेत. पण, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याला तसे वाटत नाही. गंभीरला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कार्तिक टीम इंडियात नकोय.

3 / 7

स्टार स्पोर्ट्सच्या मॅच पॉईंट शो मध्ये गौतम गंभीरला आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातील २१ चेंडूंत ३० धावांच्या खेळीबद्दल विचारण्यात आला. त्यावर कार्तिकची खेळी ही महत्त्वाची होती, असे गंभीर म्हणाला.''ती खूप महत्त्वाची खेळी होती. RCBसाठी मागील २-३ महिने तो अशी कामगिरी करतोय, परंतु दुसऱ्या ट्वेंटी-२०त त्याच्याआधी अक्षर पटेलला पाठवल्याने मला थोडे आश्चर्य वाटले. कार्तिक आधी आला असता तर मला अधिक आनंद झाला असता,''असेही गंभीरने स्पष्ट केले.

4 / 7

ट्वेंटी-२०वर्ल्ड कप स्पर्धेत कार्तिकची संघात निवड व्हायला हवी का, याबाबात गंभीरला विचारण्यात आले. लोकेश राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आदी खेळाडूंच्या पुनरागमनानंतर कार्तिकचे संघात स्थान टिकवणे अवघड होणार असल्याचे गंभीर म्हणाला.

5 / 7

'' ट्वेंटी-२० वर्ल्ड कप अजून दूर आहे आणि आताच त्याबाबत सांगणे घाईचे ठरेल. कार्तिकला सातत्य राखायला हवे, परंतु जर त्याला केवळ अखेरची तीन षटकंच फलंदाजी करायची असेल, तर परिस्थिती आव्हानात्मक बनेल. ७व्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूच्या शोधात भारतीय संघ आहे आणि जर अक्षर ७व्या क्रमांकावर खेळला, तर भारताला एक फलंदाज कमी खेळवावा लागेल,''असे गंभीर म्हणाला.

6 / 7

''असे असेल तर मी वर्ल्ड कप संघासाठी कार्तिकचा विचार करणार नाही. मला त्यापेक्षा रिषभ पंत आणि दीपक हुडा यांना संघात पाहायला आवडेल. लोकेश, सूर्या, रोहित असे खेळाडू आपल्याकडे आहेत. एकदा का ते परतले, तर कार्तिकचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान धोक्यात येईल. जर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार नसेल, तर त्याची निवड करण्यात काहीच अर्थ नाही,''असे गंभीरने स्पष्ट केले.

7 / 7

गंभीरने पुढे कार्तिकच्या वर्ल्ड कप संघातील स्थानासाठीची संधीही सांगितली. तो म्हणाला, ''रोहित, लोकेश, सूर्या व विराट हे एकदा परतले, तर कार्तिकचे प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणे अवघड आहे. त्यानंतर हुडा, पंत, हार्दिक, जडेजा आहेत. कार्तिकपेक्षा युवा व क्षेत्ररक्षणात चपळ खेळाडूंचा पर्याय आहे. त्यामुळे जर निवड समितीने अव्वल चार खेळाडूंपैकी एकाला वगळण्याचे ठरवले, तर कार्तिकला संधी मिळू शकते.''

टॅग्स :गौतम गंभीरदिनेश कार्तिकट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App