Prithvi Shaw: "कोच आणि सिलेक्टर्स कशासाठी आहेत, पृथ्वी शॉला योग्य ट्रॅकवर आणा", गौतम गंभीर भडकला

Gautam Gambhir on Prithvi Shaw: पृथ्वी शॉला योग्य ट्रॅकवर आणण्यासाठी प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांनी मदत करावी असे गौतम गंभीरने म्हटले आहे.

भारतीय संघ नववर्षातील आपल्या अभियानाची सुरूवात श्रीलंकेविरूद्धच्या मायदेशातील मालिकेतून करणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 ट्वेंटी-20 आणि 3 वन डे सामने खेळवले जाणार आहेत. आगामी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. मात्र, या मालिकांसाठी भारतीय संघाचा युवा खेळाडू पृथ्वी शॉला संधी मिळाली नाही.

सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ मागील काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मात्र, त्याची भारतीय संघाध्ये निवड होत नाही. आता यावरून भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

"प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांनी या 23 वर्षीय युवा क्रिकेटरला योग्य मार्गावर आणण्यासाठी मदत करावी. ते फक्त संघ निवडण्यासाठी किंवा संघातून खेळाडूंना बाहेर करण्यासाठी नसतात", अशा शब्दांत गंभीरने प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गौतम गंभीरने प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांना पृथ्वी शॉसारख्या युवा खेळाडूंना योग्य मार्गावर आणण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले. गंभीरने प्रशिक्षकांवर प्रश्न उपस्थित करताना म्हटले, "प्रशिक्षक कशासाठी आहेत? निवडकर्ते कशासाठी आहेत? ते फक्त संघातील खेळाडूंची निवड करण्साठी नसतात. पृथ्वी शॉसारख्या खेळाडूंना योग्य मार्गावर आणण्यासाठी निवडकर्ते, प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाने प्रयत्न करायला हवेत."

भारतीय संघ व्यवस्थापनाने पृथ्वी शॉ सोबतँ चर्चा करायला हवी. खेळाडूंना फक्त तयार करणे एवढेच काम व्यवस्थापनाचे नसते. राहुल द्रविड असो किंवा राष्ट्रीय निवड अध्यक्ष, त्यांनी युवा खेळाडूंशी चर्चा करून बाबी स्पष्ट कराव्या कदाचित त्यांना संघाभोवती ठेवावे, असेही गंभीरने म्हटले.

गौतम गंभीरने आणखी म्हटले, "जे खेळाडू योग्य मार्गावर नाहीत त्यांना संघाभोवती ठेवायला हवे. जेणेकरुन त्यांच्यावर अधिक चांगले निरीक्षण केले जाऊ शकेल. जर तुमच्यात देशासाठी खेळण्याची तळमळ असेल, तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत जगावे लागेल. मग तो फिटनेस असो वा शिस्त. प्रशिक्षकांनी पृथ्वी शॉला असे करण्यास प्रवृत्त केले पाहिजे."

लक्षणीय बाब म्हणजे संघ व्यवस्थापनाने युवा खेळाडूंना किमान दोन संधी द्याव्यात. तरीही त्याने तसे केले नाही तर कदाचित त्याला देशासाठी खेळण्याची आवड नसेल, अशा शब्दांत गंभीरने युवा खेळाडूंकडे लक्ष देण्याची मागणी केली.

श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी ट्वेंटी-20 संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला सुरूवात होणार आहे. ट्वेंटी-20 मालिका झाल्यानंतर भारतीय संघ पाहुण्या संघाविरूद्ध 10 ते 15 जानेवारी दरम्यान 3 सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे.