Gautam Gambhir Virat Kohli: "ही फालतूगिरी आता थांबवा..."; विराट कोहलीबद्दल बोलताना गौतम गंभीर संतापला

एका मुलाखतीत बोलताना गंभीरने मांडलं सडेतोड मत

Gautam Gambhir Virat Kohli: भारतीय संघाचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहली गेल्या काही सामन्यांपासून दमदार फॉर्ममध्ये परतला आहे. आशिया चषकात अनेक शानदार खेळी करत दोन अर्धशतके आणि टी२० मधील आपले पहिलेवहिले शतक झळकावले. इतकेच नव्हे तर विराट आशिया चषकातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला.

विराट कोहलीने सुरूवातीला हाँगकाँगविरूद्ध अर्धशतक ठोकले, त्यावेळी त्याच्या खेळीबाबत फारशी चर्चा रंगली नाही. पण त्यानंतर पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात विराटने आपली लय कामय राखत स्पर्धेतील दुसरे अर्धशतक ठोकले. या कामगिरीची चर्चा सुरू असतानाच, अफगाणिस्तानविरुद्ध विराट कोहलीने तब्बल हजार दिवसांपेक्षाही जास्त काळ वाट पाहायला लावणारे दमदार शतक ठोकले.

अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्याआधीच भारत स्पर्धेबाहेर गेला होता. त्यामुळे त्या सामन्यात रोहित शर्माने विश्रांती घेतली होती. त्यामुळे, हंगामी कर्णधार लोकेश राहुलसोबत विराट कोहली सलामीला आला होता. विराट-राहुलने त्या दिवशी शतकी सलामी देत साऱ्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. पण सध्या विराट कोहलीबाबत सुरू असलेल्या एका चर्चेवर माजी फलंदाज गौतम गंभीर चांगलाच संतापला असून, 'अशी फालतूगिरी पुन्हा करू नका', असे रोखठोक उत्तर त्याने एका मुलाखतीत दिले.

एका स्पोर्ट्स चॅनेलवर गौतम गंभीर चर्चासत्रात सहभागी झाला होता. त्यावेळी, सध्या सुरू असलेल्या विराट कोहलीबाबतच्या चर्चेवर त्याला प्रश्न विचारण्यात आला. विराट कोहलीने IPL मध्ये सलामीला येऊन अनेक वेळा चांगल्या टी२० खेळी केल्या आहेत. आशिया कपमध्येही सलामीला खेळतानाच त्याने शतक ठोकले. त्यामुळे टीम इंडियाने कोहलीला सलामीला उतरवण्याचा विचार करावा का? असा तो प्रश्न होता.

विराटसंदर्भातील त्या प्रश्नावर गौतम गंभीर म्हणाला, "ही अशी फालतूगिरी थांबवा. कोहलीला सलामीला फलंदाजीला उतरवायचं का याची चर्चा पुन्हा सुरु करू नका. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल दोघेही संघात असताना विराट कोहलीला सलामीला फलंदाजीला उतरवणे शक्य नाही हे साऱ्यांनी मनात पक्के करून घ्या. मी याआधीही बोललो होतो की या प्रश्नावर चर्चा करणं मूर्खपणाचं आहे. याउलट माझं असं मत आहे की, जर सलामीचे फलंदाज १० षटकं खेळून काढत असतील तर सूर्यकुमारने तीन नंबरवर खेळायला काहीच हरकत नाही. पण जर सलामीच्या एखाद्या गोलंदाजाची विकेट लवकर पडली तर मात्र विराटनेच फलंदाजीस यावे."

गंभीरच्या या मताला ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन यानेही दुजोरा दिला. "विराटला नंबर ३ वर खेळताना पाहणे मला जास्त आवडते. कारण तो प्रतिभावान आहे. त्या स्ट्राईक रोटेट करणं नीट जमतं. तो पिचवर धावण्यातही खूप चपळ आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याला स्पिन आणि वेगवान गोलंदाजी दोन्ही चांगली खेळता येत असल्याने तो डाव नियंत्रणात ठेवू शकतो. त्यामुळे मला तरी असं वाटतं की रोहित, राहुल, विराट, सूर्या- हे टॉप ४ भारतासाठी सध्या सर्वोत्तम आहेत," असे हेडन म्हणाला.