२१ चौकार, १० षटकार! ग्लेन मॅक्सवलेचे द्विशतक अन् अनेक पराक्रम, मोडला कपिल देव यांचा विक्रम

Glenn Maxwell Double Century AUS vs AFG : मुंबईचे वानखेडे स्टेडियम आज ग्लेन मॅक्सवेलने दणाणून सोडले. २९२ धावांचे लक्ष्य समोर असताना ऑस्ट्रेलियाचे ७ फलंदाज ९१ धावांत तंबूत परतले होते. इथून सामना जिंकणे म्हणजे दिव्यस्वप्नच, परंतु मॅक्सवेलने ते अस्तित्वात उतरवले... कर्णधार पॅट कमिन्सला सोबतीला घेऊन त्याने अफगाणिस्तानच्या संघाला ठोकून काढले.

इब्राहिम झाद्रानचे शतक अन् राशीद खानच्या फटकेबाजीच्या जोरावर अफगाणिस्तान वर्ल्ड कप इतिहासातील त्यांची सर्वोत्तम धावसंख्या उभी केली. अफगाणिस्तानने ५ बाद २९१ धावा उभ्या केल्या. राशीदने १७ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ३५ धावा चोपल्या. झाद्रान १४३ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह १२९ धावांवर नाबाद राहिला.

नवीन उल हक, राशीद खान, अझमतुल्लाह ओमारजाई यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्याने ऑस्ट्रेलियाची अवस्था ७ बाद ९१ अशी झाली होती. त्यात ३३ धावांवर मॅक्सवेलची सोपी कॅच सोडणे अफगाणिस्तानला महागात पडले. मॅक्सवेल २४ चेंडूंत २१ असा सामना खेचून आणला.

मुजीब उर रहमानने टाकलेल्या ४७ व्या षटकात ६,६,४,६ असे फटके मारून मॅच संपवली आणि सोबतच द्विशतकही पूर्ण केले. मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स जोडीने १७० चेंडूंत २०२ धावांची विक्रमी भागीदारी केली आणि त्यात कमिन्सच्या केवळ १२ धावा राहिल्या. मॅक्सवेलने १२८ चेंडूंत २१ चौकार व १० षटकारांच्या मदतीने नाबाद २०१ धावा केल्या. 

ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स या जोडीने ८ किंवा त्याच्या खालच्या क्रमांकासाठी वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम भागीदारीची आज नोंद केली. १९८३च्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देव आणि सय्यद किरमानी यांनी नाबाद १२६ धावांची भागीदारी केली होती. हा विक्रम आज मोडला गेला.

वर्ल्ड कप स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना सहाव्या किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर सर्वोत्तम खेळीचा विक्रम आज ग्लेन मॅक्सवेलने ( २०१*) नावावर केला. २०११मध्ये आयर्लंडच्या केव्हिन ओ ब्रायनने इंग्लंडविरुद्ध ११३ धावा केल्या होत्या.

वर्ल्ड कप स्पर्धेत द्विशतक झळकावणारा ग्लेन मॅक्सवेल तिसरा फलंदाज ठरला. मार्टीन गुप्तीलने २०१५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद २३७ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१५ मध्येच ख्रिस गेलने झिम्बाब्वेविरुद्ध २१५ धावा कुटलेल्या.

ग्लेन मॅक्सवेलने १२८ चेंडूंत २१ चौकार व १० षटकारांच्या मदतीने नाबाद २०१ धावा केल्या.  धावांचा पाठलाग करताना वर्ल्ड कपमध्ये झालेले हे पहिलेच द्विशतक ठरले.

वन डे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना झालेली ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. मॅक्सवेलने १२८ चेंडूंत २१ चौकार व १० षटकारांच्या मदतीने नाबाद २०१ धावा केल्या. २०२१ मध्ये पाकिस्तानच्या फखर जमाननने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९३ धावा केल्या होत्या.