Google Trends Cricket 2023 : ना विराट, ना रोहित...! २४ वर्षीय भारतीय खेळाडूचा 'गुगल सर्च'मध्ये बोलबाला

२०२३ हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत खास राहिले.

२०२३ हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत खास राहिले. वन डे विश्वचषक उंचावण्यात भारतीय संघाला अपयश आले असले तरी टीम इंडियाने सलग दहा विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली.

नेहमीप्रमाणे यंदा देखील गुगलने सर्वाधिक वेळा सर्च केलेल्या नावांची यादी जाहीर केली आहे. खरं तर यंदाच्या वर्षात क्रिकेटपटू म्हणून शुबमन गिलचे नाव गुगलवर झळकत राहिले.

गुगलने जारी केलेल्या अहवालात सर्वाधिक वेळा सर्च होणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना मागे टाकून शुबमन गिलने पहिले स्थान पटकावले.

गुगल ट्रेंड २०२३ मध्ये म्हणजे यंदाच्या वर्षात क्रिकेटपटूंच्या यादीत सर्वाधिक वेळा सर्च होणारा खेळाडू भारताचा गिल ठरला, तर न्यूझीलंडचा अष्टपैलू रचिन रवींद्र दुसऱ्या स्थानावर आहे.

गुगलने विविध क्षेत्राशी संबंधित यादी जारी केली आहे, ज्यामध्ये सर्वाधिक वेळा सर्च झालेल्या व्यक्तीचा, चित्रपटाचा आदींचा उल्लेख आहे.

क्रीडा क्षेत्राबद्दल भाष्य करायचे झाले तर, यंदाच्या वर्षात वन डे विश्वचषक, आयपीएल, आशिया चषक आणि महिला प्रीमिअर लीग यांसारख्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

विशेष बाब म्हणजे विश्वचषक असताना देखील सर्वाधिक लोकांनी आयपीएलला सर्वाधिक वेळा सर्च केले. २०२३ हे वर्ष शुबमन गिलसाठी खूप खास राहिले. यंदाच्या वर्षात शुबमन गिलने उत्कृष्ट फलंदाजी केली.

आयपीएल २०२३ च्या हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. यासह त्याने पहिल्यांदाच ऑरेंज कॅप पटकावली. दरम्यान, २०२३ या वर्षात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून गिलची नोंद झाली आहे. त्याने चालू वर्षात एकूण ४५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यामध्ये ५०.४२च्या सरासरीनुसार २,११८ धावा करण्यात त्याला यश आले.

वन डे मध्ये द्विशतक झळकावण्याची किमया देखील गिलने या वर्षात साधली. न्यूझीलंडविरूद्ध १४९ चेंडूत २०८ धावा करून गिल वन डे मध्ये द्विशतक झळकावणारा चौथा भारतीय ठरला.