Join us  

Happy Birthday Sachin Tendulkar: बेस्ट ऑफ सचिन तेंडुलकर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 10:58 AM

Open in App
1 / 10

1 मार्च 2003 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्ध 98 धावांची खेळी केली. शोएब अख्तर, वसीम अख्तर आणि वकार युनीस या जलदगती गोलंदाजांची तेंडुलकरने चांगलीच धुलाई केली. मुख्य म्हणजे अख्तरच्या बाऊंसरवर तेंडुलकरने अपर कट मारून खणखणीत षटकार खेचला. तेंडुलकरच्या या खेळीच्या जोरावर भारताने 6 विकेट राखून सामना जिंकला.

2 / 10

22 एप्रिल 1998 च्या या सामन्यात 25 वर्षाच्या तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते. शारजाहच्या खेळपट्टीवर तेंडुलकर नावाचे वादळ चांगलेच घोंगावलं होतं. तेंडुलकरने 131 चेंडूंत 143 धावा करताना भारतीय संघाला तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला.

3 / 10

5 नोव्हेंबर 2009 साली हैदराबाद येथे झालेल्या सामन्यात तेंडुलकरने 141 चेंडूंत 175 धावा चोपल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या याच खेळीला तेंडुलकरच्या कारकिर्दीची सर्वोत्तम खेळी म्हणून ओळख मिळाली आहे. 351 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज अपयशी ठरले होते. मात्र, तेंडुलकर एका बाजूने खिंड लढवत होता. विजयासाठी 17 धावा आवश्यक असताना तेंडुलकर बाद झाला आणि भारताला 3 धावांनी पराभव पत्करावा लागला.

4 / 10

वन डे क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज द्विशतक झळकावेल याचा विचारही कुणी कधी केला नसावा. मात्र, 24 फेब्रुवारी 2010मध्ये तेंडुलकरने हा पराक्रम केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तेंडुलकरने 147 चेंडूंत 200 धावांची विक्रमी खेळी केली. वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.

5 / 10

1994 च्या ऑकलंड वन डे सामन्यात भारताचे नियमित सलामीवीर नवज्योत सिंग सिद्धू अनफिट होता. तेव्हा सचिनला सलामीला येण्याची संधी मिळाली. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात त्याने 49 चेंडंत 82 धावांची तुफानी खेळी केली. या सामन्यानंतर तो भारतीय संघाचा नियमित सलामीवीर ठरला.

6 / 10

न्यूझीलंडविरुद्ध हैदराबाद येथे 1999 मध्ये झालेल्या सामन्यात तेंडुलकरने 150 चेंडूंत 20 चौकार व 3 षटकार खेचून 186 धावा कुटल्या. त्याने राहुल द्रविडसह दुसऱ्या विकेटसाठी 331 धावांची भागीदारी केली. वन डे क्रिकेटमधील ही सर्वोत्तम भागीदारी होती. हा विक्रम ख्रिस गेल व मार्लोन सॅम्युअल्स यांनी मोडला.

7 / 10

शाहजाहमध्ये ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा तेंडुलकरच्या वादळाचा तडाखा बसला. तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या 272 धावांच्या प्रत्युत्तरात तेंडुलकरने 134 धावांची खेळी केली आणि भारताला जेतेपद पटकावून दिले. त्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉ याने तेंडुलकर हा सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतरचा महान फलंदाज आहे, असे गौरवोद्गार काढले होते.

8 / 10

1996च्या वर्ल्ड कप स्पर्धेत घरच्या चाहत्यांसमोर तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. 259 धावांचा पाठलाग करताना तेंडुलकरने 84 चेंडूंत 14 चौकार व 1 षटकार खेचून 90 धावा केल्या, परंतु भारताला 16 धावांची हार पत्करावी लागली.

9 / 10

सिडनी येथे 2008 मध्ये झालेल्या सामन्यात तेंडुलकरने सीबी मालिकेच्या पहिल्या फायनलमध्ये 120 चेंडूंत नाबाद 117 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियातील त्याचे हे वन डेतील पहिलेच शतक होते आणि भारताने हा सामना जिंकला होता.

10 / 10

2004 मध्ये पाकिस्तानच्या भूमीत तेंडुलकर नावाचा गजर घुमला होता. 330 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तेंडुलकरने 135 चेंडूंत 17 चौकार व 1 षटकार खेचून 141 धावांची खेळी केली होती. पण संघाच्या 245 धावा झालेल्या असताना तो बाद झाला आणि भारताला 12 धावांनी हार मानावी लागली.

टॅग्स :सचिन तेंडुलकरआॅस्ट्रेलियापाकिस्तानन्यूझीलंड