HAPPY BIRTHDAY YUVI : सिक्सर किंग युवराजबाबतच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

युवराज सिंह, असा फलंदाज ज्याच्याकडे प्रत्येक चेंडू सीमापार धाडण्याची क्षमता आहे. इतकंच काय तर त्याने कॅन्सरसारख्या भयंकर आणि जीवघेण्या आजारावरही मात केली. आज त्याचा 36 वा वाढदिवस आहे.

भारताच्या या धडाकेबाज फलंदाजाला खरंतर क्रिकेटर बनायचं नव्हतं. वाचून आश्चर्य वाटलं असेल, पण हे अगदी खरं आहे. शाळेच्या दिवसात युवराज केवळ टेनिस आणि फुटबॉल खेळत असे.

युवराज सिंहने स्केटिंगच्या अंडर-14 कॅटेगरीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. मला उन्हात खेळायला आवडायचं नाही, त्यामुळे क्रिकेटपासून दूर राहायचं ठरवलं होतं, असं युवराजने सांगितलं होतं.

फारच कमी लोकांना माहित आहे की, युवराज सिंहने बालकलाकार म्हणून एका पंजाबी सिनेमात काम केलं होतं. मला अभिनय आवडतो, पण मला अॅक्टिंग करता येत नाही, असंही युवराज सांगतो.

युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनीही भारतीय क्रिकेट संघासाठी काही सामने खेळले होते. जखमी झाल्याने भारतासाठी फार काळ क्रिकेट खेळण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं. मात्र मुलाने क्रिकेट खेळावं, अशी त्यांची इच्छा होती.

युवराजच्या आत्मचरित्रावर लवकरच सिनेमा बनणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात अभिषेक बच्चनने युवीची भेट घेतली होती. सिनेमात अभिषेक युवराजची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.