"मला अचानक संघातून बाहेर हकललं. मी धोनीला कारण विचारलं, त्यावेळी..."; भज्जीचा खळबळजनक गौप्यस्फोट

"तुमच्याबाबतीत जेव्हा अचानक एखादा निर्णय घेतला जातो, आणि त्यामागचं कारण काय? त्यामागे कोणाचा हात आहे? हे प्रश्न विचारल्यावर..."

भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग याने काही दिवसांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. प्रत्येक चांगल्या गोष्टींचा कधी ना कधी शेवट होतोच असं ट्वीट करत त्याने निवृत्तीची घोषणा केली.

२०११च्या विश्वविजेत्या संघात त्याचा समावेश होता. पण त्यानंतर त्याने भारताकडून केवळ १० वनडे आणि १० टेस्ट सामने खेळले. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड कपच्या संघातही त्याला समाविष्ट करण्यात आले नव्हते.

भारतीय संघातून हरभजनला अचानक का बाहेर का काढण्यात आले, याबद्दल त्याला एका मुलाखतीत विचारण्यात आले. या प्रश्नावर बोलताना काही खळबळजनक खुलासे केले.

"मला संघाबाहेर का काढण्यात आलंय याबद्दल मी अनेकदा महेंद्रसिंग धोनीला विचारलं. तो आमच्या संघाचा कर्णधार होता, त्यामुळे मी त्यालाच या निर्णयाबद्दल विचारत होतो", असं हरभजनने सांगितलं.

"मी धोनीला जरी बरेच वेळा विचारलं असलं तरी मला धोनीने कधीही संघातून वगळण्याचं कारण दिलं नाही. त्यामुळे मग माझं मलाच समजलं की आता पुन्हा पुन्हा असा प्रश्न विचारण्यात काहीच अर्थ नाही", असंही भज्जी म्हणाला.

"तुमच्याबाबतीत जेव्हा अचानक एखादा निर्णय घेतला जातो, आणि त्यामागचं कारण काय? त्यामागे कोणाचा हात आहे? हे प्रश्न विचारूनही जर तुम्हाला त्याची उत्तरं मिळत नसतील तर तो विषय तिथेच सोडून द्यावा", असं सूचक वक्तव्यही हरभजनने केलं.

भारतीय संघातून त्याला तडकाफडकी बाहेर करण्यात आलं असलं तरीही IPL च्या हंगामात मात्र हरभजनने गेल्या हंगामापर्यंत सामने खेळले आणि दमदार कामगिरी केली.