IND vs AUS: देशासाठी WTCची फायनल खेळणार का? हार्दिक पांड्याने थेट मुद्द्यालाच घातला हात

Hardik Pandya on WTC Final: 17 तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेला सुरूवात होत आहे.

भारतीय संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील 2 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली आहे. खरं तर मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात यजमान भारताने विजय मिळवला तर स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने तिसरा सामना जिंकला. अखेरचा सामना अनिर्णित करून भारताने सलग चौथ्यांदा ही मालिका आपल्या नावावर केली.

कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ वन डे मालिकेत ऑस्ट्रेलियाशी भिडत आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे आहे. कौटुंबिक कारणामुळे नियमित कर्णधार रोहित शर्माने पहिल्या सामन्यातून माघार घेतली.

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वन डे सामना आज वानखेडे येथे होत आहे. या सलामीच्या सामन्यापूर्वी कर्णधार हार्दिक पांड्याने पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार का? असे विचारले असता पांड्याने म्हटले की, कसोटीत एखाद्याची जागा घेणे त्याच्यासाठी नैतिक ठरणार नाही.

पत्रकार परिषदेत हार्दिकने म्हटले, "नाही, मी नैतिकदृष्ट्या खूप मजबूत व्यक्ती आहे. मी तिथे पोहचण्यासाठी 10 टक्के देखील योगदान दिले नाही. त्यामुळे मी तिथे जाऊन कोणाची तरी जागा घेणे नैतिकदृष्ट्या योग्य होणार नाही."

"मला कसोटी क्रिकेट खेळायचे असेल तर मी कठोर परिश्रम करेन आणि माझे स्थान मिळवेन. त्यामुळे जोपर्यंत मला वाटत नाही की मी माझे स्थान मिळवले आहे तोपर्यंत मी WTC ची फायनल किंवा भविष्यातील कोणत्याही कसोटी मालिकेसाठी उपलब्ध होणार नाही."

भारताच्या मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज श्रेयस अय्यरची सततची दुखापत हा गंभीर विषय असल्याचे हार्दिक पांड्याने म्हटले. वन डे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हे गंभीर असल्याचे त्याने सांगितले.

श्रेयस उपलब्ध नसेल तर भारताला यावर तोडगा काढावा लागेल, असेही हार्दिक म्हणाला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत इशान किशन शुबमन गिलसह सलामीवीर म्हणून खेळेल असे हार्दिकने स्पष्ट केले.

हार्दिक पांड्याने आतापर्यंत 11 ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले आहे. हार्दिकच्या नेतृत्वात भारतीय संघाला 7 सामन्यात विजय मिळवता आला.

वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सांभाळताना आलेला अनुभव सांगताना हार्दिकने म्हटले, "वन डे आणि ट्वेंटी-20 हा एक खेळाचा विस्तार आहे, ज्यामध्ये तुम्हाला बरेच बदल करावे लागतात. तुम्हाला यात नेहमी टिकून राहावे लागते कारण प्रत्येक षटक, प्रत्येक चेंडू खेळ बदलत असतो."

तसेच वन डे क्रिकेटमध्ये तुमच्याकडे एकहून अधिक योजना असतील तर तुम्ही काहीतरी नियोजन आखले की, तेच नियोजन 6 षटकांसाठी चालू शकते, असे हार्दिकने अधिक सांगितले.