फक्त २०० रुपयांसाठी क्रिकेट खेळत होता हार्दिक पांड्या, त्यानंतर बदलले नशीब अन् १७० कोटींच्या संपत्तीचा बनला मालक!

Hardik Pandya : हार्दिकच्या घटस्फोटाच्या वृत्ताची पुष्टी होताच, त्याची एकूण संपत्ती किती? याबाबत लोकांनी माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर गुरुवारी (१८ जुलै) हार्दिक आणि नताशाने घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं.

हार्दिकच्या घटस्फोटाच्या वृत्ताची पुष्टी होताच, त्याची एकूण संपत्ती किती? याबाबत लोकांनी माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कायद्यानुसार, घटस्फोटानंतर हार्दिकला आता नताशाला मेंटेनन्स म्हणून काही रक्कम द्यावी लागणार आहे.

हार्दिकची आज करोडोंची संपत्ती असली तरी एक काळ होता, जेव्हा तो फक्त २०० रुपयांत क्रिकेट खेळायचा. हार्दिक आज करोडोंची घड्याळं घालतो आणि महागड्या कारमधून प्रवास करत असला तरी त्याचं बालपण गरिबीत गेलंय.

११ ऑक्टोबर १९९३ रोजी गुजरातमधील सुरत येथे जन्मलेला हार्दिक एकेकाळी २०० रुपयांत टेनिस क्रिकेट खेळायचा. हार्दिकच्या वडिलांना आपल्या मुलांचं करिअर घडवण्यासाठी सुरतहून वडोदरा येथं शिफ्ट व्हावे लागले.

यानंतर एक वेळ अशी आली, जेव्हा त्याच्याकडे क्रिकेटचे साहित्य घेण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळं हार्दिक आणि त्याचा भाऊ कृणाल ट्रकमधून गुजरातच्या वेगवेगळ्या गावात जायचे आणि स्थानिक टेनिस स्पर्धा खेळून २०० रुपये कमवायचे. यातून त्याला क्रिकेटचे साहित्य खरेदी करता आले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या १७० कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीचा मालक आहे. मात्र, काही रिपोर्ट्समध्ये हार्दिकची संपत्ती केवळ १०० कोटींच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले आहे.

हार्दिकला एक एकदिवसीय सामना खेळण्यासाठी बीसीसीआयकडून जवळपास २० लाख रुपये आणि टी-२० सामना खेळण्यासाठी १५ लाख रुपये मिळतात. आयपीएलमधून तो वर्षाला जवळपास १५ कोटी रुपये कमावतो. याशिवाय, हार्दिक अनेक मोठ्या ब्रँड्सना एंडोर्स करून भरपूर कमाई करतो.

२०१८ मध्ये हार्दिकने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, त्यानं आपली सर्व संपत्ती त्याच्या आईच्या नावावर ठेवली आहे, कारण तो भविष्यात त्याच्या उत्पन्नातील ५० टक्के कोणालाही देऊ इच्छित नाही. पण, नियमानुसार, हार्दिकला नताशाला काही पैसे द्यावे लागतील. मात्र ही रक्कम किती? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.