Harmanpreet Kaur Birthday: महिला क्रिकेटमध्ये दबदबा; रोहित-विराटलाही मागे टाकणारी 'रणरागिणी'!

Harmanpreet Kaur Records: शुक्रवारी हरमन तिचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे.

आज सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. आजच्याच दिवशी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा वाढदिवस असतो. शुक्रवारी हरमन तिचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या ती महिला प्रीमिअर लीगमध्ये खेळत असून मुंबई इंडियन्सच्या संघाची धुरा सांभाळत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये तिची गणना केली जाते. तिने आतापर्यंत २९६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून ६५०० हून अधिक धावा केल्या आहेत. याशिवाय तिने अनेक विक्रमांना गवसणी घातली.

ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिने भारताच्या पुरूष संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि विद्यमान कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले आहे.

२००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी हरमन आज भारतीय संघाची कर्णधार आहे. तिने ५ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामधील ८ डावात तिला १३१ धावा करता आल्या.

याशिवाय १३१ वन डे सामन्यांमध्ये तिने ३४१० धावा केल्या आहेत. तसेच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये तिने सर्वाधिक १६१ सामने खेळले असून ३२०४ धावा केल्या.

हरमनप्रीतने २०१६ मध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा स्वीकारली. १०६ ट्वेंटी-२० सामन्यांत भारताचे कर्णधारपद सांभाळताना तिने संघाला ५९ वेळा विजय मिळवून दिला, तर २४ सामने गमवावे लागले. १७ वन डे आणि २ कसोटी सामन्यांमध्येही हरमनने भारताचे नेतृत्व केले आहे.

ट्वेंटी-२० मधील कर्णधार म्हणून हरमनने धोनी, कोहली आणि रोहित या त्रिकुटाला मागे टाकले आहे. रोहित आणि धोनी यांच्या नेतृत्वात भारताने ट्वेंटी-२० मध्ये ४१-४१ सामने जिंकले आहेत. कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला ट्वेंटी-२० मध्ये ३० सामने जिंकता आले आहेत.

पण, भारतीय महिला संघाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये ५९ वेळा विजय संपादन केला आहे. त्यामुळे हरमन ही सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने जिंकणारी भारतीय कर्णधार आहे.

ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या बाबतीत हरमन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याही पुढे आहे. तिने आतापर्यंत १६१ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आतापर्यंत अनुक्रमे १५१ आणि ११७ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.