BCCI vs PCB : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताला पाकिस्तानात यायचे नसेल तर...; बाबरचा सहकारी संतापला

BCCI vs PCB : PCB ने आगामी स्पर्धेचे संभाव्य वेळापत्रक आयसीसीकडे सोपवले आहे.

आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी स्पर्धेचे संभाव्य वेळापत्रक आयसीसीकडे सोपवले आहे.

मात्र, भारतीय संघ पाकिस्तानात जाणार का? बीसीसीआय काय भूमिका घेणार? की भारत तटस्थ ठिकाणी आपले सामने खेळणार... असे प्रश्न चाहत्यांना पडत आहेत. खरे तर आशिया चषकाची स्पर्धा देखील पाकिस्तानात पार पडली. पण, टीम इंडियाचे सामने तटस्थ ठिकाणी अर्थात श्रीलंकेत खेळवले गेले.

माहितीनुसार, भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही. बीसीसीआयच्या विनंतीनुसार आयसीसी श्रीलंकेत किंवा यूएईत भारताचे सामने खेळवण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाचे संबंध जगजाहीर आहेत.

शेवटच्या वेळी या दोन्ही देशांमध्ये २०१२-१३ मध्ये द्विपक्षीय मालिका झाली होती. तेव्हापासून केवळ आशिया चषक आणि आयसीसी स्पर्धांमध्ये हे कट्टर प्रतिस्पर्धी भिडतात. पाकिस्तानने २०१७ मध्ये भारताचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकला होता.

दरम्यान, भारताने पाकिस्तान दौऱ्याला नेहमीच विरोध केला आहे. बीसीसीआय आणि भारत सरकारने अनेकदा याबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. याचाच दाखला देत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने संतप्त प्रतिक्रिया दिली. हसन भारताचा जावई असून, त्याची पत्नी हरयाणा येथील आहे.

पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीशी बोलताना हसन अलीने आपली खदखद व्यक्त केली. टीम इंडियाने आमच्या देशात यायला हवे. पण, भारत पाकिस्तानात आला नाहीतर त्यांच्याशिवाय स्पर्धा पार पडेल, असे त्याने म्हटले.

तसेच खेळ आणि राजकारण या वेगवेगळ्या बाजू आहेत. खेळात राजकारण येता कामा नये. भारतीय खेळाडूंनीही पाकिस्तानविरूद्ध खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावरून हे स्पष्ट होते की, भारतीय खेळाडूंना पाकिस्तानविरूद्ध खेळायचे आहे पण राजकारण आडवे येत आहे, असेही हसन अलीने सांगितले.

हसन अलीने आणखी सांगितले की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्येच आयोजित केली जाईल, असे म्हटले आहे. भारताला यायचे नसेल तर आम्ही त्यांच्याशिवाय खेळू. भारताशिवाय क्रिकेट होणार नाही हा केवळ गैरसमज आहे.

भारताशिवाय इतरही अनेक संघ आहेत, त्यांचे पाकिस्तानात सामने होतील. टीम इंडिया जर नाहीच आली तर त्यांच्याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी होईल हे निश्चित आहे, असे त्याने स्पष्ट केले.