मोहम्मद शमीला पत्नी हसीन जहाँमुळे मोठा धक्का; यंदाही मिळणार नाही अर्जुन पुरस्कार

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी मागील दोन वर्ष संघासाठी दमदार कामगिरी करत आहे. वन डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये तो टीम इंडियासाठी मॅच विनर गोलंदाज ठरत आहे.

जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत शमीनं त्याची कामगिरी चोख बजावली. पण, यंदाही त्याची ही मेहनत वाया जाणार आहे. यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शमीचं नाव पाठवण्यात येणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा अर्जुन पुरस्कारासाठी जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन यांच्या नावाची शिफारस केली जाणार आहे.

मोहम्मद शमीचं नाव न पाठवण्यामागचं कारण त्याची पत्नी हसीन जहाँ आहे. हसीन जहाँनं भारतीय गोलंदाजावर कौटुंबीक हिंसाचाराचा आरोप करताना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अर्जुन पुरस्कारासाठीच्या नियमानुसार शिफारस केलेल्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसावा.

हसीन जहाँनं 2018मध्ये शमीवर मॅच फिक्सिंग, अन्य महिलांशी अनैतिक संबंध आणि बलात्काराचा आरोप केला होता. हे आरोप सिद्ध न झाल्यामुळेच शमी अजूनही टीम इंडियाचा सदस्य आहे.

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ आता सोबत राहत नाही. या दोघांना एक मुलगी आहे आणि ती हसीन जहाँसोबत राहते.

अर्जुन पुरस्कारासाठी 2018 ला रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि धवनच्या नावाची शिफारस करण्यात आली होती, मात्र पुरस्कार जडेजाला मिळाला.

बीसीसीआयकडूनन यंदा पुन्हा एकदा शमीच्या नावाची शिफारस होण्याची शक्यता नाही. पत्नीसोबतचे त्याचे भांडण न्यायालयापर्यंत पोहोचले. याचा अर्थ तो पुरस्कारासाठी अयोग्य ठरतो.