NZvIND : भारताने अखेरच्या सामन्यात कसा मिळवला विजय; पाहा फक्त एका क्लिकवर

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाहुण्यांनी नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या ट्वेन्टी-२० लढतीमध्येही भारताने विजय मिळवला आणि या मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले. पण यावेळी दोन्ही संघांचे कर्णधार मैदानाबाहेर होते.

हंगामी कर्णधार रोहितने यावेळी संघाच्या क्रमवारीत बदल केला. युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला सलामीला पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला. पण संजूला या संधीचा फायदा उठवता आला नाही आणि २ धावा करून तो बाद झाला. पण त्यानंतर लोकेश राहुलने फटकेबाजी करत डाव सारवला.

संजू स्वस्तात बाद झाला असला तरी त्यानंतर रोहित आणि लोकेश राहुल यांनी संघाला डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचली. पण मोठा फटका मारण्याचा नादात तो बाद झाला. चाहत्यांनी या सामन्याचा मनमुराद आनंद लुटला.

राहुल बाद झाला असला तरी रोहितने एका बाजूने जोरदार फटकेबाजी केली. रोहितच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

कर्णधार रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताला न्यूझीलंडपुढे १६४ धावांचे आव्हान ठेवता आले.

भारताच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला चांगली सुरुवात करता आली नाही. कारण न्यूझीलंड आपले पहिले तीन फलंदाज फक्त १७ धावांत गमावले.

त्यानंतर आपला शंभरावा सामना खेळणारा रॉस टेलर आणि टीम साइफर्ट यांनी दमदार फलंदाजी करत संघाचा डाव सावरला.

टेलर आणि साइफर्ट यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचली. नवदीप सैनीने साइफर्टला बाद करत ही जोडी फोडली, त्याने ३० चेंडूंमध्ये पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली.

साइफर्ट बाद झाल्यानंतर टेलरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत अर्धशतक पूर्ण केले. पण टेलरला यावेळी नवदीप सैनीने बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. या सामन्यात सैनीबरोबर जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत सर्वाधिक तीन बळी मिळवले.

भारताचा हा न्यूझीलंडमधील ऐतिहासिक विजय आहे. कारण यापूर्वी भारताला न्यूझीलंडमध्ये एकही ट्वेन्टी-२० मालिका जिंकता आली नव्हती. यापूर्वी झालेल्या दोन्ही मालिकेत भारताला पराभव स्वीकारावा लागला होता.