एक मॅच, एक दिवस अन् १ वर्ष किती कमावतात क्रिकेट कॉमेंटेटर? आकाश चोपडांचा खुलासा

क्रिकेट मॅच पाहताना तुम्ही कॉमेंट्री ऐकली असेल परंतु किक्रेट कॉमेंटेटरची कमाई किती असते याचा विचार तुम्ही केलाय का, तर चला जाणून घेऊया

क्रिकेट मॅचमध्ये क्रिकेटर्सशिवाय बाकी अनेक लोक चांगली कमाई करतात. ज्यात कॉमेंट्री करणाऱ्या कॉमेंटटर्सचा समावेश असतो. कॉमेंटटर्स त्यांच्या कॉमेंट्रीनं मॅचच्या आनंदाला आणखी रंजक बनवतात. नेहमी माजी क्रिकेटर्स कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचे अनुभव आणि किस्से ऐकवतात.

काही कॉमेंटेटर असेही पाहायला मिळतात ज्यांनी कधी क्रिकेट खेळलेले नसते अथवा क्रिकेटच्या फिल्डशी ते जोडलेले नसतात. त्यांनी व्यावसायिक क्रिकेट अनुभवले नसते. मात्र तरीही त्यांच्या बोलण्याचा अंदाज प्रेक्षकांना मॅचशी जोडून ठेवतो.

टीम इंडियाचे माजी क्रिकेटर आकाश चोपडा हे बेस्ट कॉमेंटेटरसाठी ओळखले जातात. आकाश चोपडा यांच्या मॅच कॉमेंट्री करण्याचा अंदाज हजारो, लाखो क्रिकेट चाहत्यांना पसंत पडतो. आकाश चोपडा टीव्हीवरील कॉमेंट्रीसह सोशल मीडियावर युट्यूबमधूनही चांगली कमाई करतात.

आकाश चोपडा यांना अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये मुलाखतीला बोलावलं होतं. त्या मुलाखतीत त्यांनी कॉमेंटेटरच्या कमाईबाबत मोठा खुलासा केला आहे. क्रिकेटरना मिळणारं मानधन हे कायम चर्चेत असतं, परंतु मैदानाबाहेर क्रिकेटची कॉमेंट्री करणाऱ्यांना किती पैसे मिळतात हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते.

आकाश चोपडा यांना विचारण्यात आलं की, एका ज्यूनिअर कॉमेंटेटरला अनुभवी कॉमेंटेटर्सच्या तुलनेत किती वेतन दिले जाते, त्याचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की, कॉमेंटेटरला प्रति मॅचच्या आधारे अथवा विविध अटींवर मानधन दिले जाते

ज्यूनिअर कॉमेंटेटर एका दिवसात ३५-४० हजार कमावू शकतात तर अनुभवी कॉमेंटेटरला एका दिवसात कॉमेंट्री करण्यासाठी १० लाख रुपयेही दिले जातात असं आकाश चोपडा यांनी म्हटलं. आकाश चोपडा यांना कॉमेंटेटरच्या कमाईबाबत मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट खुलासा केला.

भारतात क्रिकेट कॉमेंटेटर प्रतिदिवशी ६ ते १० लाख कमाई करतात. एक कॉमेंटेटर सरासरी एका वर्षात १०० दिवस कॉमेंटेटर करतो, त्याची वार्षिक कमाई जवळपास १० कोटीपर्यंत जाते. कमेंटेंटर व्यतिरिक्त इव्हेंट्स आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणूनही चांगली कमाई केली जाते. मात्र मी कधी कुठल्या कमेंटेटरला त्याचे उत्पन्न विचारलं नसल्याचं सांगितले.

अनेकदा असेही घडते जेव्हा एखाद्या ऐतिहासिक सामान्याची कॉमेंट्री चाहत्यांना खूप भावते. २०२४ च्या टी २० विश्वचषकाच्या कॉमेंट्रीनेही चाहत्यांच्या मनात घर केले. शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा झेल घेतला तेव्हा जतीन सप्रूने लाँग ऑफ म्हणत केलेली कॉमेंट्री आजही चाहत्यांना आठवणीत आहे.

विशेष म्हणजे जेव्हा टीव्ही घरोघरी पोहचले नव्हते तेव्हा लोक फक्त रेडिओवर कॉमेंट्री ऐकूनच मॅचेसचा आनंद लुटत होते. आता लोकांना मॅच पाहण्यासोबत कॉमेंट्रीचा आनंद घ्यायलाही आवडतो. त्यामुळे क्रिकेटमध्ये खेळासोबतच कॉमेंट्रीलाही महत्त्व असते.

आकाश चोपडा यांच्या करिअरबाबत बोलायचं झालं तर ते टीम इंडियात खूप कमी खेळले आहे. आतापर्यंत त्यांनी १० कसोटी सामने खेळून ४३७ रन्स बनवले. आकाश चोपडा यांना कधी भारतीय क्रिकेट वनडे स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही. २००३-०४ काळात त्यांनी भारतीय टीमसाठी मॅच खेळली.