टीम इंडिया वर्ल्ड कप फायनलपर्यंत कशी पोहोचणार? ICC ने समजावलं नवीन फॉरमॅट

New format in the ICC U19 Men's Cricket World Cup 2024 पुढल्या वर्षी होणारा वर्ल्ड कप नवीन फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे.. आयसीसीने पहिल्या सामन्यापासून ते फायनलपर्यंतचा प्रवास कसा करावा हे गणित समजावून सांगितले आहे.

दक्षिण आफ्रिकेत पुढल्या वर्षी होणाऱ्या १९ वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. पाच वेळच्या विजेत्या भारताचा पहिला सामना २०२०च्या विजेत्या बांगलादेशविरुद्ध ब्लोएमफोंटेन येथे होणार आहे, तर यजमान दक्षिण आफ्रिका सलामीच्या लढतीत वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे.

१६ संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील ४१ सामने ५ वेगवेगळ्या मैदानांवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाला अ गटात बांगलादेश, आयर्लंड व अमेरिका यांचा सामना करायचा आहे. ब गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज व स्कॉटलंड; क गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे व नामिबाया, तर ड गटात अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड व नेपाळ यांचा समावेश आहे.

जानेवारी २०२४ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत १६ संघांचा प्रत्येकी ४ अशी चार गटांत विभागणी केली गेली आहे. चारही गटातील अव्वल ३ संघ सुपर सिक्ससाठी पात्र ठरतील, तर प्रत्येक गटातील शेवटचे संघ स्पर्धेतून बाहेर जाण्यापूर्वी एकमेकांविरुद्ध खेळतील. अ व ड गटातील चौथा संघ आणि ब व क गटातील चौथा संघ यांच्यात ही लढत होईल.

सुपर सिक्समध्ये पात्र ठरलेल्या १२ संघांची दोन गटांत विभागणी केली जाणार आहे. त्यानुसार अ व ड गटातील अव्वल तीन संघ एका गटात आणि ब व क गटातील अव्वल तीन संघ एका गटात असतील. प्रत्येक संघ त्यांच्या गटात दोन सामने खेळतील.

सुपर सिक्सच्या दोन गटातींल दोन अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर विजेते संघ अंतिम सामन्यात खेळतील.