युवराज सिंगचा मोठा खुलासा;'या' खेळाडूमुळे निवृत्तीचा विचार डोक्यात सुरू झाला!

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यात रविवारी इंस्टाग्राम लाईव्ह चर्चा सुरू झाली. यावेळी दोघांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. याचवेळी युवीनं निवृत्तीमागे 'हा' खेळाडू कारणीभूत असल्याचा मोठा खुलासा केला.

38 वर्षीय युवीनं भारतीय संघाच्या अनेक अविस्मरणीय विजयात सिंहाचा वाटा उचलला.

त्याशिवाय त्यानं इंडियन प्रीमिअर लीगमधील किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स, पुणे वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघांचेही प्रतिनिधित्व केले आहे.

2019मध्ये युवीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. युवीच्या या निर्णयानं चाहत्यांना धक्का नक्की बसला.

बुमराहसोबतच्या चर्चेत युवीनं वर्षभरापूर्वीच निवृत्तीचा विचार सुरू केल्याचा खुलासा केला आणि त्यामागे ऑस्ट्रेलियन खेळाडू असल्याचेही त्यानं सांगितले.

ऑस्ट्रेलियन गोलंदाज अँड्य्रू टायमुळे युवीनं 2018साली निवृत्तीचा विचार करण्यास सुरुवात केल्याचे युवी म्हणाला. युवी म्हणाला,''कारकिर्दीत तुझ्यासारख्या ( जसप्रीत बुमराह) खेळाडूंसोबत खेळताना आता निवृत्ती घ्यायला हवी, हे मला जाणवलं. पण, 2018मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबसाठी खेळताना अँड्य्रू टायनं मला 'युवी पा' अशी हाक मारली आणि तेव्हा निवृत्तीचा विचार डोक्यात सुरू झाला होता.''

युवीनं 40 कसोटी, 304 वन डे आणि 58 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या नावावर कसोटीत 1900, वन डेत 8701 आणि ट्वेंटी-20त 1177 धावा आहेत. शिवाय त्याच्या नावावर 148 आंतरराष्ट्रीय विकेट्सही आहेत.