ICC CWC 2023: वर्ल्डकपमध्ये पाच वेळचा विजेता ऑस्ट्रेलिया अडखळतोय, ही आहेत पाच कारणं

Cricket Australia, ICC CWC 2023: पाच वेळा क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाची यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील सुरुवात निराशाजनक झालीआहे. पहिल्या सामन्यात यजमान भारताकडून पराभूत झाल्यानंतर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेकडूनही ऑस्ट्रेलियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाच्या निराशाजनक सुरुवातीची प्रमुख कारणं पुढील प्रमाणे आहेत.

पाच वेळा क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाची यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील सुरुवात निराशाजनक झालीआहे. पहिल्या सामन्यात यजमान भारताकडून पराभूत झाल्यानंतर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेकडूनही ऑस्ट्रेलियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाच्या निराशाजनक सुरुवातीची प्रमुख कारणं पुढील प्रमाणे आहेत.

ऑस्ट्रेलियन संघाच्या यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील निराशाजनक सुरुवातीचं पहिलं कारण आहे संघातील काही प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापती. मार्कस स्टॉयनिससारखा ऑस्ट्रेलियाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडून दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळला नाही. तर दुसऱ्या सामन्यात त्याने केवळ दोन षटकेच गोलंदाजी केली. तसेच तो केवळ ५ धावा काढून बाद झाला.

दुसरं कारण म्हणजे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची फिरकी गोलंदाजी कमकुवत आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंचं वर्चस्व राहतं. ऑस्ट्रेलियन संघासोबत अॅडम झंपा हा नियमित आणि ग्लेन मॅक्सवेल हा अष्टपैलू फिरकीपटू आहेत. त्यांच्याशिवाय ऑस्ट्रेलियाकडे तितकासा प्रभावी फिरकी गोलंदाज नाही. त्यामुळे मधल्या षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी निष्प्रभ ठरत आहे.

तिसरं कारण म्हणजे ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व. विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व पॅट कमिन्स करत आहे. मात्र काहींच्या मते त्याच्याऐवजी अन्य कुठल्यातरी खेळाडूकडे संघाचं नेतृत्व सोपवण्याची गरज होती. पॅट कमिन्सकडे कसोटी क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. मात्र मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरसारख्या खेळाडूंकडे अधिक अनुभव आहे.

ऑस्ट्रेलियन संघ अपयशी ठरण्याचं चौथं कारण म्हणजे सलग दोन सामन्यात अपयशी ठरलेली फलंदाजी. भारताविरोधात ऑस्ट्रेलियाचा संघ १९९ धावांवर गारद झाला होता. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाची फलंदाजी आणखी निराशाजनक झाली आणि ऑस्ट्रेलियन संघ १७७ धावांवर ऑल आऊट झाला. स्टिव्ह स्मिथने पहिल्या सामन्यात ४६ आणि दुसऱ्या सामन्यात १९ धावा काढल्या. तर लाबुशेन यानेही चिवट फलंदाजी केली. मात्र इतर फलंदाजांकडून साफ निराशा झाली.

ऑस्ट्रेलियन संघाच्या सुमार कामगिरीमागचं पाचवं कारण म्हणजे कांगारूंनी दोन्ही सामन्यात केलेलं ढिसाळ क्षेत्ररक्षण. पहिल्या सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना मिचेल मार्शने विराट कोहलीचा झेल सोडला होता. तो सुटलेला झेल सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीतही ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांनी अनेक झेल सोडले. तेच त्यांना शेवटी महागात पडले. मात्र दोन पराभव झाले असले तरी ऑस्ट्रेलियन संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेलं नाही. चुका सुधारून पुढचे सामने जिंकल्यास ऑस्ट्रेलियाकडे स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची संधी असेल.