T20 World Cup 2022: किंग कोहलीच्या 'विराट' खेळीला ICC ने ठोकला सलाम; एकट्यानं पाकिस्तानला लोळवलं!

आयसीसीने विश्वचषकातील १० सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची यादी जाहीर केली असून यामध्ये भारताच्या विराट कोहलीचा समावेश आहे.

२०२२च्या टी-२० विश्वचषकाचा किताब भलेही इंग्लिश संघाने पटकावला, मात्र भारताच्या किंग कोहलीने शानदार खेळी करून वर्चस्व गाजवले. विराट कोहलीसाठी टी-२० विश्वचषक २०२२ खास ठरला. या विश्वचषकात त्याने सर्वाधिक २९६ धावा केल्या. यामध्ये ४ अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. मात्र उपांत्य फेरीत भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला.

आयसीसीने विश्वचषकातील १० सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या नाबाद ८२ धावांच्या खेळीचा देखील समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानने दिलेल्या १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ३१ धावांवर ४ बळी गमावले होते. लक्षणीय बाब म्हणजे भारताला शेवटच्या ८ चेंडूत २८ धावा करायच्या होत्या.

विराट कोहलीने सलामीच्या सामन्यातील १९व्या षटकातील शेवटच्या २ चेंडूवर हारिस रौफला २ षटकार ठोकले होते. अखेरच्या षटकात भारताला १६ धावा करायच्या होत्या. कोहलीने मोहम्मद नवाजच्या चेंडूवर षटकार ठोकला. आर अश्विनने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला होता.

आयसीसीने जाहीर केलेल्या या यादीत आयर्लंडच्या कर्टिस कॅम्परलाही स्थान मिळाले आहे. त्याने नामिबियाविरुद्ध नाबाद ७२ धावांची खेळी केली होती. या वेगवान गोलंदाजाने २९ धावा देऊन २ बळीही घेतले होते. १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संघाने ६१ धावांवर ४ गडी गमावले होते, यानंतर कॅम्परने विजयी खेळी केली.

सुपर-१२ मध्ये भारताचा एकमेव पराभव दक्षिण आफ्रिकेकडून झाला होता. वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने सामन्यात चांगली कामगिरी करत २९ धावांत ४ बळी घेतले. यामध्ये लोकेश राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली या बड्या खेळाडूंचा समावेश होता. यानंतर हार्दिक पांड्याला देखील तंबूत पाठवून एनगिडीने भारताच्या फलंदाजीची कंबर मोडली होती.

झिम्बाब्वेने टी-२० विश्वचषकात मोठी उलटफेर करून पाकिस्तानचा पराभव केला होता. या सामन्यात फिरकीपटू सिकंदर रझाने २५ धावा देऊन 3 बळी घेतले होते. त्याने सलग २ चेंडूंवर शादाब खान आणि हैदर अली यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. खरं तर विश्वचषकाच्या संपूर्ण स्पर्धेत रझाची कामगिरी चांगली होती.

या यादीत पाकिस्तानच्या शादाब खानलाही स्थान मिळाले आहे. संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय आवश्यक होता, परंतु़ पाकिस्तानी संघाने ९५ धावांत ५ गडी गमावले होते. अशा परिस्थितीत शादाबने २२ चेंडूत ५२ धावा करत धावसंख्या १८५ धावांवर नेली. त्यानंतर या अष्टपैलू खेळाडूने १६ धावांत २ बळी देखील घेतले.

इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज ॲलेक्स हेल्सच्या नाबाद ८६ धावांच्या खेळीचे आयसीसीनेही कौतुक केले आहे. हेल्सने उपांत्य फेरीत भारताविरुद्ध ४७ चेंडूत ताबडतोब खेळी केली होती. त्याने ७ षटकार ठोकून भारतीय संघाला विश्वचषकातून बाहेरचा रस्ता दाखवला. यामुळे इंग्लिश संघाला १० गडी राखून मोठा विजय मिळवता आला.

ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉयनिसच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात नाबाद ५९ आणि न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सच्या श्रीलंकेविरुद्धच्या १०४ धावा यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. नेदरलँड्सचा गोलंदाज ब्रॅंडन ग्लोव्हरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९ धावांत ३ बळी घेत विजय मिळवला होता. तर विश्वचषकाच्याच्या अंतिम सामन्यात सॅम कॅरनने पाकिस्तानविरुद्ध ४ षटकात १२ धावा देऊन ३ बळी घेतले.