ICC Men's T20I Team of the Year 2022 : ICCच्या सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघात विराट कोहलीसह तीन खेळाडूंची एन्ट्री, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

ICC Men's T20I Team of the Year 2022 : ICCने वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघ आज जाहीर केला. विराट कोहलीसह भारताच्या तीन खेळाडूंचा यात समावेश आहे

जोस बटलर ( कर्णधार, इंग्लंड) - जोस बटलरसाठी २०२२ हे वर्ष एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून अविश्वसनीय होते. 15 सामन्यांमध्ये बटलरने 160.41 च्या स्फोटक स्ट्राइक रेटने 462 धावा केल्या. जून 2022 मध्ये इऑन मॉर्गनच्या निवृत्तीनंतर, जोस बटलरची इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि कर्णधार म्हणून पहिल्याच ICC स्पर्धेत त्याने ICC ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला. त्याने 144.23 च्या स्ट्राइक रेटने सहा सामन्यांत 225 धावा केल्या आणि तो स्पर्धेत इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) - मोहम्मद रिझवानने 2021 ते 2022 पर्यंत आपला फॉर्म कायम ठेवला. त्याने या वर्षभरात 996 धावा केल्या. पुरुषांच्या T20I धावांच्या यादीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो सूर्यकुमार यादवनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिझवानने वर्षभरातील 10 अर्धशतके केली आणि T20 वर्ल्ड कप स्पर्धेत 175 धावांसह पाकिस्तानसाठी संयुक्त-सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. रिझवानने सलग दुसऱ्या वर्षी ICC T20I टीम ऑफ द इयरमध्ये बटलरच्या बरोबरीने सुरुवातीचे स्थान राखले आहे.

विराट कोहली (भारत) - २०२२ हे वर्ष होते विराट कोहलीने पुन्हा एकदा जुन्या काळातील किंग कोहलीची झलक दाखवली. पाच सामन्यांत २७६ धावा करून त्याने आशिया चषक तुफान गाजवली. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावून जवळपास तीन वर्षांचा शतकाचा दुष्काळही संपुष्टात आणला. T20 वर्ल्ड कपमध्येही कोहलीने मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नाबाद 82 धावांची खेळी केली आणि भारताला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. वर्ल्ड कप स्पर्धेत 296 धावांसह सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

सूर्यकुमार यादव (भारत) - सूर्यकुमार यादवने T20 मध्ये अफलातून कामगिरी केली आहे. त्याने या फॉर्मेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात 1000 हून अधिक धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय व जगातील दुसऱ्या फलंदाजाचा मान पटकावला. त्याने वर्षाचा शेवट सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून केला. त्याने दोन शतकं आणि नऊ अर्धशतकांसह 1164 धावा केल्या. सूर्याने T20 वर्ल्ड कप स्पर्धेतही 189.68 च्या स्ट्राइक रेटने 239 धावा केल्या. त्याने हे वर्ष ICC पुरुषांच्या T20I खेळाडूंच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकाचे फलंदाज म्हणून पूर्ण केले.

ग्लेन फिलिप्स (न्यूझीलंड) - फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर ग्लेन फिलिप्सने दमदार कामगिरी केली. 26 वर्षीय खेळाडूने 21 सामन्यांमध्ये 156.33 च्या स्ट्राइक रेटने एकूण 716 धावा केल्या. T20 वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुरुवातीच्या सामन्यात भन्नाट झेल घेतला आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले. त्याने 158.26 च्या वेगाने 201 निर्णायक धावा काढत न्यूझीलंडच्या अंतिम चारमध्ये पोहोचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

सिकंदर रझा (झिम्बाब्वे) - सिकंदर रझा हा झिम्बाब्वे क्रिकेटसाठी केंद्रस्थानी होता. अष्टपैलू खेळाडूने एकामागून एक चमकदार कामगिरी केली. झिम्बाब्वेसाठी ७३५ धावा करून तो केवळ आघाडीचा धावा करणारा होता असे नाही तर त्याने ६.१३ च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटने २५ विकेट्स घेत त्यांच्यासाठी विकेट्स चार्टवर आघाडी घेतली होती. जुलैमध्ये T20 वर्ल्ड कप पात्रता B मध्ये तो टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू होता. त्याने पर्थमध्ये झिम्बाब्वेच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला .

हार्दिक पंड्या (भारत) - 2022 मध्ये हार्दिकने बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये खूप मोठे योगदान दिले. त्याने 607 धावा केल्या आणि 20 विकेट्सही घेतल्या. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीसह त्याने महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्याच्या 33 चेंडूत 63 धावांनी भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध सन्मानजनक धावसंख्या मिळवून दिली होती, परंतु ही खेळी अखेर व्यर्थ ठरली.

सॅम करन (इंग्लंड) - 2022 च्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू सॅम करनने इंग्लंडच्या विजेतेपदाच्या मोहिमेत डेथ-ओव्हर्स स्पेशलिस्ट म्हणून चोख भूमिका वठवली. त्याने सहा सामन्यांतून १३ बळी घेतले. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 5/10 अशी कामगिरी केली आणि इंग्लंडकडून प्रथमच T20I मध्ये पाच विकेट घेण्याचा पराक्रम झाला. करनने अंतिम सामन्यात 3/12 अशी कामगिरी करून पाकिस्तानच्या फलंदाजांना धक्के दिले.

वानिंदू हसरंगा (श्रीलंका) - वानिंदू हसरंगा हा श्रीलंकेच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याने आशिया चषक स्पर्धेतील सहा सामन्यांमध्ये नऊ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामन्यात 27 चेंडूत 37 धावांची शानदार खेळी केली. T20 विश्वचषकातही आपली जादू चालवली आणि आठ सामन्यांत 15 विकेट्स घेतल्या.

हरिस रौफ (पाकिस्तान) - पाकिस्तानने एक संघ म्हणून 2022 चा आनंद लुटला – आशिया कपच्या अंतिम फेरीत आणि नंतर T20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्या दोन्ही स्पर्धांमध्ये हरिस रौफ महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आशिया चषक स्पर्धेत तो आठ विकेट्ससह संयुक्त दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. नंतर T20 वर्ल्ड कपमध्ये त्याने फायनलमध्ये जोस बटलरसह दोन महत्त्वपूर्ण विकेट्स काढून पाकिस्तानला संधी दिली परंतु अखेरीस इंग्लंडने विजय मिळवला.

जोश लिटल (आयर्लंड) - कॅलेंडर वर्षातील दुसरा सर्वाधिक बळी घेणारा जोश लिटलने 2022 मध्ये आयर्लंडच्या आक्रमणाचे नेतृत्व सांभाळले. डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने कॅलेंडर वर्षात 39 विकेट घेतल्या, त्यापैकी 11 टी-20 विश्वचषक स्पर्धेत आले.