Join us  

ICC World Cup 2023 : वर्ल्ड कपनंतर १० दिग्गज खेळाडू घेऊ शकतात वन डेतून निवृत्ती; आश्चर्यचकित करेल शेवटचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 10:53 AM

Open in App
1 / 10

शिखर धवन - आयसीसी स्पर्धांमध्ये शिखर धवनने दमदार कामगिरी केली आहे. २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयात शिखरचा सिंहाचा वाटा होता आणि जर त्याला संधी मिळाली तर तो २०२३ चा वन डे वर्ल्ड कपही खेळू शकतो. पण, ३७ वर्षीय शिखरचं वय पाहता आणि भारतीय संघात स्थान पटकावण्यासाठी युवा खेळाडूंची सज्ज असलेली फौज पाहता वन डे क्रिकेटमधून तो निवृत्ती घेऊ शकतो. त्याने १६७ वन डे क्रिकेटमध्ये ४४.११ च्या सरासरीने ६७९३ धावा केल्या आहेत आणि त्यात १७ शतकं व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे.

2 / 10

विराट कोहली - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीनही फॉरमॅटमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या विराट कोहली २०२३ च्या वन डे वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेऊ शकतो. बीसीसीआयने ट्वेंटी-२० संघासाठी आता विराटचा विचार करणार नसल्याचे संकेत दिले आहेत आणि आता हा खेळाडू कसोटीवर लक्ष केंद्रीत करू शकतो. २००८मध्ये त्याच्या नेृत्वाखाली भारताने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे आणि आता त्याला वन डे वर्ल्ड कप जिंकून सीनियर लेव्हलवरील आयसीसी स्पर्धा जिंकावी लागेल. विराटने २७१ वन डे सामन्यांत १२८०९ धावा केल्या आहेत. त्यात ४६ शतकं व ६४ अर्धशतकांचा समावेश आहे. विराट आता ३५ वर्षांचा आहे.

3 / 10

रोहित शर्मा - २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्माने धमाका उडवून दिला होता आणि वर्ल्ड कपच्या एका स्पर्धेत पाच शतकं करणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. आता २०२३ मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारत वर्ल्ड कप जिंकेल असा विश्वास भारतीय चाहत्यांना आहे. विराटप्रमाणे रोहितही वन डे वर्ल्ड कपनंतर केवळ कसोटीवर लक्ष केंद्रीत करू शकतो आणि तोही ३६ वर्षांचा होईल. रोहितने २४१ वन डे सामन्यांत ३० शतकं व ४८ अर्धशतकांसह ९७८२ धावा केल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतक नावावर असलेला तो जगातील एकमेव फलंदाज आहे.

4 / 10

रवींद्र जडेजा - भारताच्या या मॅच विनर खेळाडूने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दमदार पुनरागमन केले. ३४ वर्षीय रवींद्र जडेजा वन डे क्रिकेटमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे आणि २०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यानेही १७१ वन डे सामन्यांत २४४७ धावा आणि १८९ विकेट्स घेतल्या आहेत.

5 / 10

फॅफ ड्यू प्लेसिस - ३८ वर्षीय दक्षिण आफ्रिकेच्या फॅफ ड्यू प्लेसिसला देशाला पहिला वर्ल्ड कप जिंकून देऊन कारकीर्दिचा शेवट करण्याची संधी आहे. त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहेच आणि वर्ल्ड कप नंतर तो वन डे क्रिकेटलाही राम राम ठोकू शकतो. पण, त्याला निवड समिती संधी देते का हाही प्रश्न आहेच. त्याने १४३ वन डे सामन्यांत ५५०७ धावा केल्या आहेत.

6 / 10

मुश्फीकर रहिम - बांगलादेशचा हा अनुभवी फलंदाज वन डे वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेऊ शकतो. ३५ वर्षीय मुश्फीकरने त्याची कारकीर्द गाजवली आहे. त्याने २३९ वन डे सामन्यांत ३६.४२च्या सरासरीने ६८११ धावा केल्या आहेत.

7 / 10

ट्रेंट बोल्ट - न्यूझीलंडचा प्रमुख गोलंदाज ट्रेंट बोल्ट याचाही निवृत्ती घेणाऱ्या खेळाडूंमध्ये समावेश असू शकतो. २०१९च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सेमी आणि फायनलमध्ये बोल्टने भारतीय फलंदाजांची झोप उडवली होती. दुखापतीमुळे ३३ वर्षीय गोलंदाजाला बराच काळ व्यावसायिक क्रिकेटला मुकावे लागले होते. त्याला न्यूझीलंडच्या करारातूनही बाहेर केले गेले आहे. बोल्टने ९९ वन डे सामन्यांत १८७ विकेट्स घेतल्या आहेत.

8 / 10

सिकंदर रझा - पाकिस्तानात जन्मलेला, परंतु झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिकंदर रझाने मागच्या वर्षीचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप गाजवला. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागात त्याने त्याचे नाणे खणखणीत वाजवले. तोही २०२३ च्या वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेऊ शकतो. झिम्बाब्वेने २०२३ च्या वर्ल्ड कपची पात्रता अद्याप निश्चित केलेली नाही. १९९९मध्ये त्यांनी पाचवे स्थान पटकावून वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली होती. रझाने १२६ वन डे सामन्यांत ३७२४ धावा आणि ७१ विकेट्स घेतल्या आहेत.

9 / 10

मोहम्मद नबी - अफगाणिस्तानचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी २०२३ वर्ल्ड कपनंतर निवृत्तीचा विचार करतोय. ३८ वर्षीय नबीने १३६ वन डे सामन्यांत २९६८ धावा आणि १४४ विकेट्स घेतल्या आहेत.

10 / 10

डेव्हिड वॉर्नर - ऑस्ट्रेलियाचा सूपरस्टार डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म सध्या हरवला आहे. बॉर्ड गावस्कर ट्रॉफीतून त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. ३७ वर्षीय वॉर्नर २०२३चा वन डे वर्ल्ड कप खेळून निवृत्त होण्याच्या विचारात आहे. त्याने १४१ वन डे सामन्यांत ६००७ धावा केल्या आहेत आणि त्यात १९ शतकं व २७ अर्धशतकांचा समावेश आहे.

टॅग्स :आयसीसीरोहित शर्मारवींद्र जडेजाशिखर धवनविराट कोहली
Open in App