भारतीय संघ सेमी फायनलमध्ये! आता ३ जागांसाठी ९ जणांमध्ये शर्यत; जाणून घ्या समीकरण

ICC ODI World Cup 2023 Semi final Scenario : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आता एकमेव संघ अपराजित राहिला आहे आणि तो भारतीय संघ आहे... रविवारी भारत-न्यूझीलंड हे दोन अपराजित संघ समोरासमोर आले आणि त्यात भारताने बाजी मारली. सलग ५ विजय मिळवून भारताने वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील जागा निश्चित केली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने ४ विकेट्स व १२ चेंडू राखून विजय मिळवला. डॅरिल मिचेल ( १३०) व राचिन रवींद्र ( ७५) यांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने झेप घेतली होती. पण, मोहम्मद शमीने ५४ धावांत ५ विकेट्स घेऊन त्यांना २७३ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले.

कर्णधार रोहित शर्मा ( ४६) व शुबमन गिल ( २६) यांनी चांगली सुरुवात करून दिली. विराट कोहलीने १०४ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ९५ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यर ( ३३) व लोकेश राहुल ( २७) यांच्यानंतर रवींद्र जडेजाने ( ३९*) सामना संपवला. भारताने ४८ षटकांत ६ बाद २७४ धावा केल्या.

सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला,''आम्ही स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे, परंतु आता काम निम्मे झाले आहे. मोहम्मद शमीने मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला. या विजयाचे गोलंदाजांना श्रेय द्यायला हवे. कोहलीबद्दल आता मी आणखी काय बोलू, त्याने अशी खेळी अनेकदा केली आहे.''

भारतीय संघ सलग ५ विजयांची नोंद करून १० गुण व १.३५३ नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहे. भारताने ९ पैकी ५ सामने जिंकले आहेत आणि आणखी ४ सामने त्यांना खेळायचे आहेत. इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सचा सामना करायचा आहे. यापैकी २ सामने भारत सहज जिंकेल. त्यामुळे भारताचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के झाले आहे.

न्यूझीलंड ८ गुण व १.४८१ नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानी आहे आणि त्यांचेही ४ सामने शिल्लक आहेत. दक्षिण आफ्रिका ६ गुणासह तिसऱ्या स्थानावर आहेत आणि त्यांना उर्वरित ५ पैकी ३ किंवा ४ विजय मिळवावे लागतील.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया प्रत्येकी ४ गुणांसह टॉप फोअरमध्ये जागा पक्की करण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांना उर्वरित ५ सामने जिंकून स्वतःला सेफ करता येणार आहे.

बांगलादेश, नेदरलँड्स, श्रीलंका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांचे प्रत्येकी २ गुण आहेत. त्यांचे आव्हान संपल्यात जमा असले तरी त्यांना अन्य संघांना धक्का देऊन स्पर्धेत उलटफेर नोंदवता येणार आहे.