कुणी झाडावर बसलंय, तर...! क्रिकेट मॅच पाहण्यासाठी तुडूंब गर्दी; UAEच्या फलंदाजाने झळकावले वन डे इतिहासातील वेगवान शतक

ICC ODI World Cup league 2 - क्रिकेटची क्रेझ पाहायचीय तर भारत किंवा पाकिस्तान या देशांत पाहा... असे ठासून सांगणाऱ्या क्रिकेट तज्ज्ञांचे डोळे आज नक्कीच चक्रावले असतील...

नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती ( Nepal vs UAE) यांच्यातल्या वन डे सामन्याला तुडूंब गर्दी जमलेली पाहायला मिळाली.

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठीच्या लीग २ मधील हा सामना पाहण्यासाठी नेपाळचे स्टेडियम खचाखच भरले होते. काही चाहते तर चक्क झाडावर बसून या वन डे सामन्याची मजा घेताना दिसले.

सोशल मीडियावर या स्टेडियमला प्रेक्षकांचा लाभलेल्या प्रतिसादाचे बरेच फोटो व्हायरल झाले आहेत आणि त्यात एरियर फोटो तर अनेक क्रिकेट तज्ज्ञांना चक्रावून टाकणारा आहे.

नेपाळसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी हा सामना जिंकल्यास ते थेट वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेसाठी पात्र ठरतील आणि त्यानंतर मुख्य स्पर्धेसाठी त्यांची शर्यत सुरू होईल.

UAEने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३१० धावांचा डोंगर उभारला आहे. वृत्या अरविंदने ९४ आणि आसिफ खानने नाबाद १०१ धावांची खेळी केली.

आसीफने ४२ चेंडूंत ४ चौकार व ११ षटकार खेचून शतक पूर्ण केले. वन डे क्रिकेट इतिहासातील संलग्न संघटनेच्या खेळाडूने झळकावलेले हे सर्वात वेगवान शतक ठरले आहे.

नेपाळने ४४ षटकांत ६ बाद २६९ धावा केल्या आणि अंधुक प्रकाषामुळे सामना थांबवला गेला. DLS नुसार नेपाळला विजयी घोषित केले गेले आणि त्यांनी वर्ल्ड कप पात्रता फेरीत प्रवेश केला.