World Cup 2023 : आर अश्विनची संघात अनपेक्षित एन्ट्री अन् वर्ल्ड कप स्पर्धेत लगेच नोंदवला विक्रम

ICC ODI World Cup: भारतीय संघाने काल त्यांच्या वन डे वर्ल्ड कप संघात बदल जाहीर केला. आशिया चषक स्पर्धेत दुखापतग्रस्त झालेल्या अक्षर पटेलला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी आर अश्विनची भारतीय संघात एन्ट्री झाली. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापनाच्या विचारतही नसलेल्या अश्विनचे नाव टीम इंडियाच्या अंतिम १५ संघात आले आणि त्याच्या नावावर विक्रम नोंदवला गेला.

५ ऑक्टोबरपासून वन डे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे आणि यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत ५ वयस्कर खेळाडू आहेत आणि त्यात आर अश्विनचा समावेश झालाय... नेदरलँड्सचा वीस्ली बॅरेसी हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. तो ३९ वर्ष व १४९ दिवसांचा आहे. त्याने २०१०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आतापर्यंत ४५ सामने खेळले. २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील नेदरलँड्सच्या संघातही त्याचा समावेश होता.

रोएलॉफ इरास्मस व्हॅन हेड मर्व ( ३८ वर्ष व २७२ दिवस) यंदाच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील हा दुसरा वयस्कर खेळाडू ठरला. २००९मध्ये त्याने वन डे संघातून पदार्पण केले असले तरी त्याने केवळ नेदरलँड्ससाठी १६ सामने खेळले आहेत.

अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नबी हा ३८ वर्ष व २७१ दिवसांचा आहे. २००९ पासून त्याने आतापर्यंत अफगाणिस्तानसाठी १४७ वन डे सामने खेळले आहेत. २०१५च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने संघाचे नेतृत्वही सांभाळले होते.

महमुदुल्लाह ( ३७ वर्ष व २३७ दिवस) बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू २००७ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय आणि २०११ पासून ते २०२३ असे सलग चार वन डे वर्ल्ड कप तो खेळणार आहे.

आर अश्विन ( ३७ वर्ष व १२० दिवस) हा या यादीतील एकमेव वर्ल्ड कप विजेता खेळाडू आहे. २०११च्या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा तो सदस्य होता आणि यंदा अक्षर पटेलच्या माघारीमुळे त्याची लॉटरी लागली.