पाकिस्तानचा चमत्काराला 'नमस्कार'! वर्ल्ड कपमधून बाहेर फेकले जाण्याच्या भीतीने अजब विधान

ICC ODI World Cup, Pakistan Cricket Team : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पराभवाची हॅटट्रिक साजरी करणाऱ्या पाकिस्तान संघाने आता 'चमत्कारा'ला नमस्कार करायला सुरुवात केली आहे. पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवल्यानंतर हवेत असलेल्या बाबर आजम अँड टीमला नंतर इतरांनी जमिनीवर आणले. अफगाणिस्तानने तर त्यांना पार लोळवले..

आता ५ सामन्यांत २ विजयासह ४ गुणांची कमाई करून ते पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांना उपांत्य फेरीचे गणित सोडवण्यासाठी उर्वरित ४ लढती तर जिंकाव्या लागतीलच, शिवाय इतरांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार आहे.

अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान संघावर प्रचंड टीका झालेली पाहायला मिळतेय.. बाबरला वर्ल्ड कपनंतर कर्णधार पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशात आता त्यांच्यासाठी प्रत्येक सामना हा करो वा मरो असाच आहे. शुक्रवारी त्यांच्यासमोर फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. त्यापूर्वी संघाचा उप कर्णधार शादाब खान व मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

''ही आमच्यासाठी डू ऑर डाय परिस्थिती आहे आणि आमची विजयाची मालिका उद्यापासून सुरू होईल,''असा विश्वास शादाबने व्यक्त केला. तो पुढे म्हणाला,''आमचा चमत्कारावर विश्वास आहे आणि आम्ही अशा परिस्थितीतून यापूर्वीही बाऊन्स बॅक केले आहे. आम्ही आशावादी आहोत आणि आम्ही उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू. जलदगती गोलंदाजांवर आमचा विश्वास आहे. एक संघ म्हणून आम्ही सध्या अडखळत असतो, तरी याच गोलंदाजांनी आम्हाला पूर्वी अनेक सामने जिंकून दिले आहेत. उद्याचा दिवस हा नवा असेल आणि आणि आमची विजयाची भूक मिटलेली नाही. आम्ही एकसंघ आहोत.''

शादाबची कामगिरी काही खास झालेली नाही आणि त्याला एका सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवले गेले होते. त्याच्यावर टीकाही होतेय. त्यावर तो म्हणाला, माझ्यावरील टीका रास्त आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील माझी कामगिरी चांगली झालेली नाही आणि मी ते स्वीकारतो. पण, वाईट वेळ फार काळासाठी नसते. आमच्या संघाने सर्व आघाड्यांवर निराशाजनक कामगिरी केली आहे. पण, आगामी सामन्यात आम्ही दमदार कामगिरी करू, याची मला खात्री आहे.

मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर म्हणाले, आम्हाला सहा सामने जिंकायची गरज आहे आणि वर्ल्ड कप जिंकण्यासाठी ते पुरेसं आहे. आम्ही हे करू शकतो, याची जाण आम्हाला आहे. त्यामागे कोणतंच कारण नाही. एक चांगला दिवस आणि आम्ही कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो.