क्विंटन डी कॉकचा वर्ल्ड रेकॉर्ड! रोहित शर्माच्या विक्रमाची ऐशीतैशी, नोंदवले भारी पराक्रम

दक्षिण आफ्रिकेने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पुन्हा एकदा ३५० पार धावा उभ्या केल्या. क्विंटन डी कॉकने यंदाच्या पर्वात चौथे शतक झळकावले, तर रॅसी व्हॅन डेर ड्युसेन यानेही शतकी खेळी केली. न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३५८ धावांचे लक्ष्य ठेवताना आफ्रिकेने विक्रमांचा पाऊस पाडला. न्यूझीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने आज सर्वोत्तम ( ३५७) धावा आज केल्या. २३ वर्षांपूर्वी त्यांनी सेंच्युरियन येथे ४ बाद ३२४ धावा केल्या होत्या.

क्विंटन डी कॉकने ११६ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ११४ धावांची खेळी केली आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक २२ षटकार खेचणाऱ्या यष्टिरक्षकाचा मान पटकावला. त्याने अॅडम गिलख्रिस्ट ( १९), मार्क बाऊचर ( १५) आणि महेंद्रसिंग धोनी ( १५) यांना मागे टाकले.

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक धावा करणाऱ्या यष्टिरक्षक-फलंदाजांमध्ये क्विंटन डी कॉकने ( ५४५) आज अव्वल स्थान पटकावले. कुमार संगकाराने २०१५मध्ये ५४१ धावा केल्या होत्या.

रॅसी व्हॅन डेर ड्युसेन याने ११८ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह १३३ धावा केल्या आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील दक्षिण आफ्रिकेकडून झालेली ही तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. १९९४ मध्ये डेव्ह कॅलॅघन यांनी नाबाद १६९ आणि २००३ मध्ये हर्षल गिब्सने १४३ धावा केल्या होत्या.

वन डे वर्ल्ड कपच्या एका पर्वात सर्वाधिक ८२ षटकारांचा विक्रम दक्षिण आफ्रिकेने नोंदवला. २०१९मध्ये इंग्लंडने ७९ षटकार खेचल्या होत्या. २०१५मध्ये वेस्ट इंडिजने ६८ आणि २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाने ६७ षटकार खेचले होते.

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ९ वेळा ३५०+ धावा करण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी आज दक्षिण आफ्रिकेने बरोबरी केली. दक्षिण आफ्रिकेने सलग ८ सामन्यांत ३००+ धावा करण्याचा मोठा पराक्रम केला.

रोहित शर्माने २०१९मध्ये ५ शतकं झळकावली होती, तर कुमार संगकाराने २०१५ मध्ये ४ शतकं केलेली. आफ्रिकेकडून क्विंटनचे हे वन डेतील २१वे शतक ठरले आणि त्याने हर्षल गिब्सची बरोबरी केली. हाशिम आमला ( २७) व एबी डिव्हिलियर्स ( २५) आघाडीवर आहेत.

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत ७ इनिंग्जनंतर सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम आज क्विंटन डी कॉकने ( ५४५) नावावर केला. त्याने रोहित शर्माचा २०१९मधील ५४४ धावांचा विक्रम मोडला. कुमार संगकाराचा ५४१ ( २०१५), सचिन तेंडुलकरचा ५२३ ( १९९६) आणि सचिनचा ४७४( २००३) धावांचा विक्रमही त्याने मोडला.