दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी ठेवलेल्या ३१२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४०.२ षटकांत १७७ धावांत तंबूत परतला. आफ्रिकेने १३४ धावांनी विजय मिळवून ४ गुण व २.३६० अशा नेट रन रेटसह अव्वल स्थानी झेप घेतली. ऑस्ट्रेलिया दोन पराभवांसह -१.८४६ नेट रन रेट घेऊन नवव्या क्रमांकावर आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच ऑस्ट्रेलियाला सलग चार सामन्यांत हार पत्करावी लागली आहे. ते आता नेदलँड्सच्या खाली म्हणजेच नवव्या क्रमांकावर आहेत. अफगाणिस्तान दहाव्या स्थानी आहे.
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासह न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान यांनी प्रत्येकी दोन विजय मिळवले आहेत. न्यूझीलंड १.९५८ नेट रन रेटसह अव्वल स्थानावर होता. भारतीय संघ १.५०० अशा नेट रन रेटसह दुसऱ्या आणि पाकिस्तान ( ०.९२७) तिसऱ्या क्रमांकावर होता. दक्षिण आफ्रिका १ विजय व २.०४० नेट रन रेटसह चौथ्या क्रमांकावर होता आणि आज त्यांनी दुसरा विजय मिळवून थेट अव्वल स्थानावर झेप घेतली.
साखळी फेरीच्या सामन्यानंतर जे संघ अव्वर चार असतील ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. साखळी फेरीतील अव्वल संघ विरुद्ध चौथा संघ आणि दुसरा संघ विरुद्ध तिसरा संघ असे उपांत्य फेरीचे सामने होतील. त्यानंतर १९ नोव्हेंबरला फायनल होईल.
२०१९मध्ये न्यूझीलंड व पाकिस्तान यांच्यात चौथ्या स्थानासाठी चुरस झाली होती. दोन्ही संघांनी समान ५ विजयासह ११ गुणांची कमाई केली होती. त्यांच्या एक सामना अनिर्णीत राहिलेला. अशावेळी नेट रन रेट कामी आला होता. ३ संघांनी सहा विजय मिळवल्यास नेट रन रेटवर निकाल लागेल. अशा परिस्थितीत ७ विजय हे सर्वात सुरक्षित गणित आहे.
२०१९च्या वर्ल्ड कप प्रमाणेच ९ पैकी ७ सामने जिंकणारा संघ उपांत्य फेरीसाठी सहज पात्र ठरेल. ६ विजयानंतरही संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो, परंतु त्याला अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल. जर संघांचे गुण समान झाले, तर नेट रन रेटचा विचार केला जाईल आणि त्यानंतर निर्णय होईल.
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा दुसरा टप्पा संपला आणि सर्व संघांचे प्रत्येकी २ सामने खेळून झाले आहेत. त्यात अव्वल चारमध्ये आफ्रिका, भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड आहेत.गतविजेता इंग्लंड पाचव्या क्रमांकावर आहे.