पहिल्या दोन सामन्यातील दारुण पराभव आणि तिसऱ्या सामन्यातील विजयानंतर आता भारतीय संघ आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणार का हा प्रश्न विचारला जात आहे. मात्र आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला केवळ चांगला खेळच नाही तर नशिबाची साथही आवश्यक असेल.
पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवांमुळे भारतीय संघाचे उपांत्य फेरीतील भवितव्य हे आता इतर संघांच्या हाती आहे. त्यातही अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडच्या संघांच्या कामगिरीवर भारताची वाटचाल अवलंबून आहे. गच २ मधून भारतीय संघाकडे उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी तीन मार्ग आहेत. त्यातील दोन मार्ग भारताच्या हाती तर एक न्यूझीलंडच्या हाती आहे.
गट २ मधील गुणतक्त्यावर नजर टाकल्यास पाकिस्तानचा संघ हा ४ सामन्यात चार विजयांसह उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आता या गटात दुसऱ्या स्थानासाठी चढाओढ सुरू आहे. सध्या या स्थानावर अफगाणिस्तानचा कब्जा आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा क्रमांक लागतो. तर भारतीय संघ पाचव्या क्रमांकावर आहे. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठीचे भारतीय संघासमोर तीन मार्ग आहेत, ते पुढीलप्रमाणे...
अफगाणिस्तानवरील विजयानंतर भारतीय संघाला आता उर्वरित दोन सामन्यांतही विजय मिळवावा लागेल. शुक्रवारी भारताचा सामना स्कॉटलंडसोबत होणार आहे. तर अखेरचा साखळी सामना नामिबियाशी होणार आहे. अफगाणिस्तानसोबतच्या विजयामुळे भारताचा रनरेट प्लसमध्ये गेला आहे. तर अफगाणिस्तानचा नेट रनरेट ३.०९७ वरून १.४८१ वर घसरला आहे. जर भारतीय संघाने स्कॉटलंड आणि नामिबियाला एकूण १२० धावांच्या फरकाने नमवले तर भारताचा रन रेट अफगाणिस्तानपेक्षा अधिक होईल.
न्यूझीलंडच्या संघाने त्यांचे शेवटे दोन्ही सामने जिंकले तर नेट रनरेटचा खेळ संपुष्टात येईल. आणि आठ गुणांसह न्यूझीलंडचा संघ थेट उपांत्य फेरीत दाखल होईल. असा परिस्थिती भारत आणि अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात येईल. न्यूझीलंडचा संघ शेवटचे दोन सामने अफगाणिस्तान आणि नामिबियाशी होणार आहेत.
भारतीय संघाकडून झालेल्या दारुण पराभावानंतर अफगाणिस्तानचा नेट रनरेट खूप घसरला आहे. अशा परिस्थितीत आता अफगाणिस्तानच्या संघाने न्यूझीलंडला योग्य अंतराने हरवले तर भारतीय संघाच्या आशा जागृत होऊ शकतात, अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेटप्रेमींच्या नजरा ह्या रविवारी होणाऱ्या अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील लढतीकडे असतील.