T20 World Cup 2021 Scenarios for India to Qualify: अफगाणिस्ताला ९९च्या आत गुंडाळले असते तर भारताचा मार्ग झाला असता सोपा, पण आता...

ICC T20 World Cup 2021 Scenarios for India to Qualify: भारतीय संघानं अखेर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. सांघिक खेळ करताना टीम इंडियानं बुधवारी अफगाणिस्तानवर ६६ धावांनी विजय मिळवत नेट रन रेट -१.६०९ वरून ०.०७३ असा सुधारला. पण, हा सुधारलेला नेट रन रेट त्यांना उपांत्य फेरीत घेऊन जाऊ शकतो का?, चला जाणून घेऊया...

रोहित शर्मा व लोकेश राहुल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध २ बाद २१० धावांचा डोंगर उभा केला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये २००+ धावा करणारा भारत हा पहिलाच संघ ठरला. रोहित ४७ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकार खेचून ७४ धावांवर माघारी परतला. लोकेश ४८ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६९ धावा करून माघारी परतला.

यानंतर हार्दिक पांड्या व रिषभ पंत यांनीही वाहत्या गंगेत हात धुतले. रिषभ पंतनं १३ चेंडूंत २७ ( १ चौकार व ३ षटकार) धावा केल्या, तर हार्दिक पांड्यानं १३ चेंडूंत ३५ ( ४ चौकार व २ षटकार) धावा करताना टीम इंडियाला २ बाद २१० धावांचा पल्ला गाठून दिला

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या अफगाणिस्तानला मोहम्मद शमीनं पहिला धक्का दिला. मोहम्मद शाहजाद ( ०) तिसऱ्या षटकात बाद झाला. पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहनं अफगाणिस्तानची दुसरी विकेट काढली. हझरतुल्लाह झजाई १३ धावा करून बाद झाला.

रहमतुल्लाह गुरबाज व गुलबदीन नैब यांनी काही उत्तुंग फटके मारून अफगाणिस्तानच्या चाहत्यांना खूश केलं. रवींद्र जडेजानं ही जोडी तोडली व गुरबाज १९ धावांवर बाद झाला. त्यानंतर आर अश्विननं अफगाणिस्तानच्या नैब ( १८) व नजिबुल्लाह झाद्रान ( ११) यांची विकेट काढली. अश्विननं पाच वर्षांनंतर ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये विकेट घेतली.

मोहम्मद नबी आणि करिम जनत यांनी चांगला खेळ केला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मोहम्मद शमीनं १९व्या षटकात नबीला ३५ धावांवर बाद केले. सर रवींद्र जडेजानं अफलातून झेल टिपला. त्याच षटकात राशिद खानही भोपळ्यावर माघारी परतला. अफगाणिस्तानला ७ बाद १४४ धावा करता आल्या आणि भारतानं ६६ धावांनी हा सामना जिंकला. मोहम्मद शमीनं ३२ धावांत ३ विकेट्स घेतल्या.

ग्रुप २ मध्ये पाकिस्तान ८ गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचला आहे. अफगाणिस्तान ४ गुण व १.४८१ नेट रन रेटसह दुसऱ्या आणि न्यूझीलंड ४ गुण व ०.८१६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडं तीनच सामने खेळला आहे. भारतानं आज विजय मिळवून २ गुण व ०.०७३ नेट रन रेटसह चौथे स्थान पटकावले आहे.

आज अफगाणिस्ताननं १६० धावा केल्या असत्या आणि न्यूझीलंडला १ धावेनं हरवून ते उपांत्य फेरीत पोहोचतील. पण, भारताला उर्वरित दोन सामन्यांत स्कॉटलंड व नामिबिया यांच्याविरुद्ध १२ षटकांत विजय मिळवायला हवा आहे. न्यूझीलंडचे दोन सामने शिल्लक आहेत आणि त्यांनी अफगाणिस्तान व नामिबिया यांचा पराभव केल्यास ते उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

भारतानं आजच्या सामन्यात अफगाणिस्तानला ९९ किंवा त्यापेक्षा कमी धावांत गुंडाळले असते तर स्कॉटलंड व नामिबिया यांना नमवून त्यांचा नेट रन रेट हा अफगाणिस्तान व न्यूझीलंडपेक्षा सरस झाला असता.

जर अफगाणिस्ताननं न्यूझीलंडवर एक धावेनं विजय मिळवला आणि न्यूझीलंडनं नामिबियावर ६० धावांनी विजय मिला तर भारताला उर्वरित दोन्ही सामने १०७ धावांच्या फरकानं जिंकावे लागतील. ( भारत १६० धावा करेल हे अपेक्षित धरून)

Read in English