४-०-९-४! अर्शदीप सिंगने अमेरिकेविरुद्ध ५ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले; झहीर खानलाही मागे टाकले

ICC T20 World Cup 2024 IND vs USA Live Scorecard - अर्शदीप सिंगने ( ARSHDEEP SINGH ) आज मैदान गाजवले. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ४ षटकांत ९ धावांत ४ विकेट्स घेऊन विश्वविक्रमी कामगिरी केली. त्याच्या भेदक माऱ्यासमोर अमेरिकेला ८ बाद ११० धावा करता आल्या. हार्दिक पांड्या ( ४-१-१४-२), अक्षर पटेल ( १-२५) यांच्यासह भारताच्या अन्य गोलंदाजांनी चांगला मारा केला. अमेरिकेसाठी स्टीव्हन टेलर ( २४), नितीश कुमार ( २७), कोरी अँडरसन ( १५), आरोन जोन्स ( ११) व शादली व्हॅन ( ११) यांनी चांगले योगदान दिले.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अर्शदीप सिंगने भारताकडून सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम नावाव केला. आज त्याने ९ धावांत ४ विकेट्स घेऊन आर अश्विनचा २०१४ सालचा ( ४-११ वि. ऑस्ट्रेलिया) विक्रम मोडला. हरभजन सिंग ( ४-१२ वि. इंग्लंड, २०१२), रुद्रप्रताप सिंग ( ४-१३ वि. दक्षिण आफ्रिका, २००७), झहीर खान ( ४-१९ वि. आयर्लंड, २०१९) यांनाही त्याने मागे टाकले.

अर्शदीप सिंग हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये एका सामन्यात पूर्ण ४ षटकं फेकून १० पेक्षा कमी धावा देणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी २००७ मध्ये एस श्रीसंथने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२ धावा दिल्या होत्या.

अर्शदीप सिंगने पहिल्या चेंडूवर विकेट घेतली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा अर्शदीप हा भारताचा दुसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी भुवनेश्वर कुमारने ( दुसऱ्या डावात) २०२२च्या वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेच्या वेस्ली माझेव्हेरेला बाद केले होते. त्यामुळे अर्शदीप हा सामन्याच्या पहिल्या चेंडूवर ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला.

वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेणारा तो तिसरा डावखुरा जलदगती गोलंदाज ठरला. रुबेन ट्रम्पेलमन ( NAM vs OMN) आणि फझहल फारूकी ( AFG vs UGA) यांनी अशी कामगिरी केलीय.

अर्शदीप सिंग हा ट्वेंटी-२०त एकापेक्षा अधिकवेळा ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणारा पहिला भारतीय डावखुरा जलदगती गोलंदाज ठरला. त्याने न्यूझीलंडविरुद्ध २०२२ मध्ये हा पराक्रम केला होता. झहीर खान, आरपी सिंग व बरिंदर सरन यांना एकदाच असा पराक्रम करता आला.