इंग्लंडच्या संघाने दमदार कमबॅक करताना वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. 1992नंतर इंग्लंडचा संघ प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करू शकला आहे. त्यामुळे घरच्या प्रेक्षकांसमोर जेतेपद उंचावण्याचा त्यांचा निर्धार असेल. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. 11 जुलैला होणाऱ्या या सामन्यापूर्वी इंग्लंडच्या खेळाडूंनी सोमवारी विम्बल्डनच्या कोर्टवर हजेरी लावली. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन, जो रूट, टॉम कुरण आणि जॉनी बेअरस्टो यांनी राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांचा सेंट्रल कोर्टवर रंगलेला सामना पाहिला. यावेळी अँड्य्रु स्ट्रॉस, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन हेही उपस्थित होते.