Join us  

World Test Championship final scenarios : टीम इंडियाची गरूड भरारी, इंग्लंडला दुहेरी धक्का; मोडले गेले अनेक विक्रम!

By स्वदेश घाणेकर | Published: February 16, 2021 1:10 PM

Open in App
1 / 9

India vs England, 2nd Test Day 4: आर अश्विनच्या ( R Ashwin) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या कसोटीत मोठ्या विजयाची नोंद केली. इंग्लंडला ४८२ धावांचं आव्हान पेलवलं नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ १६४ धावांत तंबूत परतला. दुसऱ्या डावात अक्षर पटेलनं ( Axar Patel) पाच विकेट्स घेत पदार्पणाचा सामना गाजवला.

2 / 9

अक्षर पटेलनं ६० धावांत पाच विकेट्स घेतल्या. आर अश्विननं ५३ धावांत ३, तर कुलदीप यादवनं २५ धावांत २ विकेट्स घेत विजयात मोठा हातभार लावला. अश्विननं पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या आणि १०६ धावांची वादळी खेळीही केली होती.

3 / 9

कसोटी पदार्पणात पाच विकेट्स घेणारा अक्षर हा ९वा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी मोहम्मद निस्सार ( १९३२), वामन कुमार ( १९६१) , सय्यद आबीद अली ( १९६७), दिलीप दोशी ( १९७९), नरेंद्र हिरवानी ( १९८८), अमित मिश्रा ( २००८), आर अश्विन ( २०११), मोहम्मद शमी ( २०१३) यांनी असा पराक्रम केला आहे.

4 / 9

भारतानं हा सामना ३१७ धावांनी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. कुलदीप यादव आणि आर अश्विन यांनी अनुक्रमे २ व ३ विकेट्स घेतल्या. या विजयासह कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) घरच्या मैदानावर सर्वाधिक २१ कसोटी जिंकण्याच्या महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) विक्रमाशी बरोबरी केली.

5 / 9

भारताचा हा पाचवा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी टीम इंडियानं २०१५/१६मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दिल्ली कसोटीत ३३७ धावांनी विजय मिळवला होता. त्यापाठोपाठ ३२१ वि न्यूझीलंड, इंदूर २०१६/१७, ३२० वि. ऑस्ट्रेलिया, मोहाली २००८/०९, ३१८ वि. वेस्ट इंडिज, नॉर्थ साऊंड, २०१९, ३१७ वि. इंग्लंड, चेन्नई २०२१ हा असा क्रमांक येतो.

6 / 9

आशिया खंडात कसोटी सामन्यात ५ किंवा त्यापेक्षा अधिक स्टम्पिंग होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी भारत-इंग्लंड यांच्यात १९५२ व १९८८ मध्ये चेन्नईतच असा विक्रम झाला होता.

7 / 9

घरच्या मैदानावर तीनही प्रकारच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विजय नोंदवणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये विराट कोहलीनं मोहम्म अझरुद्दीन यांच्याशी बरोबरी केली आहे. महेंद्रसिंग धोनी ७३ विजयासह अव्वल स्थानी आहे, तर विराट व अझरुद्दीन यांनी प्रत्येकी ५३ विजय मिळवले आहेत.

8 / 9

या विजयासोबत टीम इंडियानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी झेप घेतली, तर इंग्लंडची पुन्हा चौथ्या स्थानी घसरण झाली. भारताच्या खात्यात ४६० गुण ( ६९.७ %) आहेत, इंग्लंडच्या खात्यात ४४२ गुण ( ६७.० %) आहेत.

9 / 9

जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी इंग्लंडला आता उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. ३-१ असा विजयच त्यांना अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून देऊ शकतो. भारतानं ही मालिका जिंकल्यास त्यांचे अंतिम फेरीतील स्थान पक्के होईल. पण ही मालिका २-२ किंवा १-१ अशा बरोबरीत सुटल्यास ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत प्रवेश करेल.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाआॅस्ट्रेलियाविराट कोहलीआर अश्विन