इंग्लंडनं पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवून टीम इंडियाला मोठा धक्का दिला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship ) फायनलच्या दृष्टीनं ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे चेन्नईतील पराभवानं टीम इंडियाच्या अडचणीत किंचितशी वाढ केली आहे.
इंग्लंडनं २२७ धावांनी विजय मिळवून ICC World Test Championship च्या गुणतक्त्यात थेट अव्वल स्थानी झेप घेतली आणि टीम इंडियाची चौथ्या स्थानी घसरण झाली. इंग्लंड ४४२ गुणांसह व ७०.२ टक्क्यांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे. टीम इंडियाची थेट चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.
न्यूझीलंड संघानं ICC World Test Championship स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावल्यानंतर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील दुसरा प्रतिस्पर्धी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतून ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाही या शर्यतीत आहे, परंतु त्यांनी दक्षिण आफ्रिका दौरा ( ३ कसोटी मालिका) स्थगित करण्याचा निर्णय घेतला अन् त्यांनाही भारत-इंग्लंड मालिकेवरच अवलंबून राहावं लागत आहे.
फायनलचं तिकिट पटकावण्यासाठी टीम इंडियाला चार सामन्यांच्या मालिकेत २-१ किंवा ३-१ असा विजय मिळवावा लागेल. तेच इंग्लंडला ही मालिका ३-०, ३-१ किंवा ४-० अशी जिंकावी लागेल.
या मालिकेचे निकाल ऑस्ट्रेलियासाठीही महत्त्वाचे आहेत. इंग्लंडनं ही मालिका १-०, २-० किंवा २-१नं जिंकल्यास आणि मालिकेचा निकाल १-१ किंवा २-२ असा बरोबरीत लागल्यास ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये प्रवेश करेल.
पण, आता टीम इंडियाला २-१ असा विजय मिळवूनही अंतिम सामन्यात प्रवेश मिळेल, याची खात्री नाही. विराट कोहलीनं पहिल्या कसोटीत षटकांची मर्यादा कमी राखली होती, ICCनं अजून त्यावर कारवाई केलेली नाही, परंतु जर ती झाल्यास त्याचा परिणाम WTCच्या गुणांत होऊ शकतो आणि तो टीम इंडियाला महागात पडू शकलो.
भारतानं ही मालिका २-१ अशी जिंकल्यास त्यांचे ५०० गुण होतील आणि गुणांची सरासरी ही ६९.४४ टक्के राहिला. मग भारत फायलन खेळेल.
टीम इंडियाला एक पेनल्टी ओव्हर मिळाल्या, त्यांचे गुण ४९८ होतील आणि तेच सरासरी ६९.१७ टक्के होईल. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया ( ३३२) आणि भारत यांची सरासरी ६९.१७ टक्के अशी बरोबरीत राहिल. मग धावा/विकेट यांची सरासरी काढली जाईल, त्यात भारताची सरासरी ही १.४९६ आहे आणि ऑस्ट्रेलियाची १.३९२ ( पहिल्या कसोटीनंतर) अशी आहे.
दोन किंवा अधिक पेनल्टी ओव्हर मिळाल्यास भारताची सरासरी ही ६८.८९ टक्के होईल आणि मग ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्सवर अंतिम सामना होईल.