"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी

Arjun Tendulkar Chris Gayle Yuvraj Singh, IPL 2025 Mumbai Indians: अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या संघात असला तरीही त्याला खेळण्याची संधी मिळालेली नाही

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा 'पुढचा ख्रिस गेल' बनू शकतो असा विश्वास 'सिक्सर सिंग' युवराज सिंग याचे वडील आणि माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी व्यक्त केला आहे.

सध्या सुरु असलेल्या IPL 2025 मध्ये अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. यंदाच्या मेगा लिलावात MI ने अर्जुनला ३० लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे.

मुंबई इंडियन्स संघासोबत अर्जुन तेंडुलकरचे हे तिसरे वर्ष आहे. गेल्या हंगामात त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळवण्यात आले होते. पण यंदा अजूनही त्याला संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही.

अर्जुन तेंडलकरला काही वर्षांपूर्वी ट्रेनिंग देणाऱ्या योगराज सिंग यांनी क्रिकेटनेक्स्टच्या मुलाखतीत भविष्यवाणी केली. त्यांनी वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल याच्याशी अर्जुनशी तुलना केली आहे.

"अर्जुन तेंडुलकरच्या क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, त्याच्या गोलंदाजीपेक्षा फलंदाजीकडे पाहा. एखाद्या फास्ट बॉलरला स्ट्रेस फॅक्चर झाल्यावर तो वेगवान प्रभावी मारा करू शकत नाही," असे ते म्हणाले.

"पण मला विश्वास आहे की, अर्जुन तेंडुलकरला युवराज सिंगकडे सोपवलं पाहिजे. जर युवराज सिंगने अर्जुन तेंडुलकरला तीन महिने नीट ट्रेनिंग दिलं, तर तो क्रिकेटमधला पुढला ख्रिस गेल होईल," असे ते म्हणाले.