डेब्यू मॅचमध्ये विराटला बाद करणारा 'विकेट'च्या शोधात; KKRला विजयाच्या पटरीवर आणणार?

sunil narine ipl : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे.

सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. या हंगामात काही अनुभवी खेळाडूंनी लय पकडली असून चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, काही दिग्गज खेळाडू अद्याप संघर्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू सुनील नरेनचा देखील समावेश आहे. खरं तर त्याला मागील ४ सामन्यांमध्ये एकही बळी घेता आला नाही. आताच्या घडीला केकेआरचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.

आयपीएल २०२३ मध्ये केकेआरच्या संघाची सुरूवात निराशाजनक झाली. संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले असून केवळ २ सामन्यात विजय मिळाला आहे. नितीश राणाच्या नेतृत्वातील संघाला पाच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

३४ वर्षीय फिरकीपटू सुनील नरेनने २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वन डे मधील आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने विराट कोहलीला आपल्या जाळ्यात फसवले होते. ट्वेंटी-२० मध्ये त्याने आतापर्यंत ४८४ बळी घेतले आहेत.

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात नरेनला त्याची लय कायम राखता आली नाही. काल झालेल्या चेन्नई सुपर किंग्जविरूद्धच्या सामन्यात त्याने २ षटकांत २३ धावा दिल्या अन् बळी देखील घेता आला नाही.

आयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंत सुनील नरेनला ७ सामन्यात फक्त ६ बळी घेता आले आहेत. ३३ धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. दुसरीकडे, आयपीएलमध्ये पदार्पण करणारा युवा फिरकीपटू सुयश शर्माने नरेनपेक्षा अधिक ७ बळी घेतले आहेत.

त्याचवेळी आणखी एक मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने कोलकाता नाईट रायडर्सकडून सर्वाधिक १० बळी घेतले. सुनील नरेनने त्याच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत ४४६ सामन्यांमध्ये ४८४ बळी घेतले आहेत. १९ धावा देऊन ५ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

लक्षणीय बाब म्हणजे त्याने बारावेळा ४ बळी घेण्याची किमया केली आहे. वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूंमध्ये समावेश असलेल्या नरेनने ५१ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ५२ बळी घेतले आहेत.

फिरकीपटूशिवाय स्फोटक फलंदाज अशी देखील सुनील नरेनची प्रतिमा आहे. त्याने आतापर्यंत २८० डावांमध्ये ३,४२५ धावा केल्या आहेत. यामध्ये १३ अर्धशतकी खेळींचा समावेश आहे.

सुनील नरेनचा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सध्या संघर्ष करत आहे. नवनिर्वाचित कर्णधाराच्या नेतृत्वात संघाला केवळ २ सामने जिंकता आले आहेत.