सध्या आयपीएलच्या १६व्या हंगामाचा थरार रंगला आहे. यंदाचा हंगाम सुरू होऊन आता १५ दिवस उलटले आहेत. जवळपास सर्वच संघानी आपले पहिले ३ सामने खेळले असून गुणतालिकेत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आताच्या घडीला राजस्थान रॉयल्सचा संघ अव्वल स्थानी आहे.
यंदाच्या हंगामात नव्याने सुरू झालेल्या इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमामुळे अनेक संघांना फायदा झाला. तर काही संघांना इम्पॅक्ट प्लेयरच्या चमकदार कामगिरीमुळे पराभव स्वीकारावा लागला. चला तर मग जाणून घेऊया इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या आणि सामन्याचा निकाल बदलणाऱ्या खेळाडूंबद्दल.
या यादीत पहिले नाव व्यंकटेश अय्यरचे आहे, ज्याने गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला होता. यानंतर रिंकू सिंगने अखेरच्या षटकात सलग पाच षटकार ठोकून कोलकाता नाईट रायडर्सला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.
गतविजेत्या गुजरातविरूद्ध व्यंकटेश अय्यरने ४० चेंडूत ८३ धावांची खेळी केली. इम्पॅक्ट प्लेयरच्या रूपात आलेल्या अय्यरने सामन्याचा निकाल बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या हंगामातील आठव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्ससाठी एक युवा खेळाडू संकटमोचक ठरला. सुयश वर्मा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात आला आणि १९ वर्षीय खेळाडूने आयपीएलचा पदार्पणाचा सामना अविस्मरनीय केला.
सुयश वर्माने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध ३० धावा देत ३ महत्त्वाचे बळी घेतले. या मॅचविनिंग स्पेलनंतर सुयश प्रसिद्धीच्या झोतात आला. देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी त्याच्या या खेळीचे कौतुक केले.
या यादीत कृष्णप्पा गौतमचे देखील नाव आहे. गौतमला दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळण्याची संधी मिळाली होती. लखनौ सुपर जायंट्सच्या गौतमने या सामन्यात १ चेंडू खेळला आणि ५ धावा केल्या. याशिवाय त्याने ४ षटकांत केवळ २३ धावा देऊन आपल्या संघाच्या विजयात योगदान दिले.
हंगामातील सातव्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात गुजरातच्या विजय शंकरने मिळालेल्या संधीचे सोने करताना २३ चेंडूत २९ धावा कुटल्या. या छोट्याश्या खेळीच्या जोरावर गुजरातने ६ गडी आणि ११ चेंडू राखून विजय मिळवला.
खरं तर इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमाचा फायदा गुजरातच्या संघाला पहिल्याच सामन्यात झाला. केन विल्यमसन दुखापतीमुळे बाहेर झाल्यानंतर साई सुदर्शन इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात आला.
साई सुदर्शनने १७ चेंडूत २३ धावा करून चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. विल्यमसननंतर साई सुदर्शनला गुजरातच्या संघात संधी मिळाली आहे पण त्याला काही खास कामगिरी करता आलेली नाही.