लखनौची सलग दुसऱ्यांदा एलिमिनेटरमध्ये झेप; पराभूत होऊनही मिळणार कोट्यवधींचे बक्षीस

lucknow super giants ipl prize money : मागील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौला बाहेरचा रस्ता दाखवला होता.

लखनौ सुपर जायंट्सच्या संघाला सलग दुसऱ्यांदा एलिमिनेटरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. आपल्या पदार्पणाच्या हंगामात अर्थात मागील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौला बाहेरचा रस्ता दाखवला होता.

यंदा संघाचा नियमित कर्णधार लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत देखील लखनौने एलिमिनेटरपर्यंत मजल मारली. पण मुंबई इंडियन्सने ८१ धावांनी मोठा विजय मिळवत लखनौला चीतपट केले.

मुंबईचा संघ दुसऱ्या क्वालिफायमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सशी भिडेल. यातील विजयी संघ चेन्नई सुपर किंग्जसोबत २८ मे रोजी फायनलचा सामना खेळेल.

शुक्रवारी मुंबई आणि गुजरात यांच्यात सामना होणार असून यातील विजयी संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. काल झालेल्या सामन्यात मुंबईने ऐतिहासिक विजय मिळवत लखनौला बाहेरचा रस्ता दाखवला.

विशेष बाब म्हणजे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मुंबई इंडियन्सने लखनौला पराभूत केले. ८१ धावांनी मोठा विजय मिळवून मुंबईने फायनलकडे कूच केली आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या क्वालिफायमध्ये गुजरातला पराभूत करून फायनलचे तिकिट मिळवले. चेन्नईने आयपीएलच्या इतिहासात तब्बल अकरावेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

एलिमिनेटरमध्ये पराभूत होणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सला ६ कोटी ५० लाख रूपयांचे बक्षीस मिळणार आहे, तर क्वालिफाय २ मध्ये पराभूत होणाऱ्या संघाला ७ कोटी रूपये मिळतील.

आयपीएल २०२३ च्या विजेत्या संघाला २० कोटी रूपये मिळतील. याशिवाय उपविजेत्या संघावर १३ कोटी रूपयांचा वर्षाव होईल.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा ऑरेंज कॅप देऊन गौरव केला जातो. ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूस १५ लाखाचे बक्षीस मिळते.

तसेच सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देऊन सन्मानित केले जाते. हंगामातील सर्वात यशस्वी गोलंदाजाला देखील बक्षीस म्हणून १५ लाख रूपये दिले जातात.