विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघेही मोठ्या कालावधीपर्यंत भारतीय संघासाठी एकत्र खेळले आहेत. विराटने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तेव्हा गंभीरने संघात स्वत:चे स्थान मजबूत केले होते.
२००८ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर विराटला पहिल्या वन डे शतकासाठी तब्बल दीड वर्षांची वाट पाहावी लागली होती. डिसेंबर २००९ मध्ये विराटने श्रीलंकेविरूद्ध शतक झळकावले होते. याच सामन्यात गौतम गंभीरने १५० धावांची अप्रतिम खेळी केली होती.
१५० धावांच्या खेळीमुळे गंभीरला सामनावीर पुरस्कार घोषित झाला होता. पण गंभीरने सर्वांची मनं जिंकत हा पुरस्कार विराटला सुपुर्द केला होता. तेव्हा असे वाटले होते की, आगामी काळात दोघे चांगले सहकारी बनतील पण तसे झाले नाही.
विराट आणि गंभीर यांच्यात सर्वप्रथम आयपीएल २०१३ मध्ये वाद झाला होता. तेव्हा विराट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा कर्णधार होता तर गौतम गंभीरकडे कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाची धुरा होती.
आता पुन्हा एकदा ही जोडी एका वादामुळे चर्चेत आली आहे. आताच्या घडीला गंभीर लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा मार्गदर्शक आहे, तर विराट आरसीबीचा सलामीवीर म्हणून खेळत आहे.
क्रिकेट वर्तुळात असे बोलले जाते की, गौतम गंभीरच्या मनात भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची प्रतिमा फारशी चांगली नव्हती. तर दुसरीकडे विराट कोहली सुरूवातीपासूनच धोनीच्या बाजूने राहिला आहे. विराटची जसजशी ताकद वाढत गेली त्यामुळे गंभीरचे पद छोटे होत गेले.
याच कारणामुळे गौतम गंभीरच्या मनात विराट कोहलीप्रती राग असल्याचे बोलले जाते. आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यात देखील याचा प्रत्यय पाहायला मिळाला. आयपीएलमधील कालचा सामना वादामुळे चांगलाच चर्चेत राहिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यजमान लखनौ सुपर जायंट्सचा त्यांच्याच घरात पराभव केला.
दोन्ही संघातील पहिला सामना बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर झाला होता. तेव्हा लखनौच्या संघाने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवून आरसीबीचा पराभव केला होता. या विजयानंतर लखनौचा मार्गदर्शक गंभीरने प्रेक्षकांसमोर तोंडावर बोट ठेवण्याचा इशारा केला होता.
काल लखनौ येथे झालेल्या सामन्यात आरसीबीने विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीने देखील गंभीरला त्याच्यात शैलीत उत्तर दिले. सामन्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची देखील झाली, ज्यानंतर अमित मिश्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कर्णधार फाफ डू प्लेसिस (४४) आणि विराट कोहली (३१) वगळता कोणत्याच आरसीबीच्या फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. निर्धारित २० षटकांत आरसीबीचा संघ ९ बाद १२६ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात लखनौच्या फलंदाजांची देखील वाईट अवस्था झाली. कृष्णप्पा गौतम (२३) वगळता एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. कर्णधार लोकेश राहुलच्या दुखापतीमुळे लखनौच्या संघाची डोकेदुखी वाढली. अखेर लखनौचा संघ निर्धारित २० षटके देखील खेळू शकला नाही आणि १९. ५ षटकांत १०८ धावांवर सर्वबाद झाला. आरसीबीने १८ धावांनी विजय मिळवून लखनौला पराभवाची धूळ चारली.