विराट कोहलीपेक्षा जय शाह 'शक्तिशाली', क्रिकेट विश्वात BCCI सचिवांची 'पॉवर'

Most Powerful Indians List: जय शाह क्रिकेट जगतातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती ठरले आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI). या बीसीसीआयचे सचिव जय शाह क्रिकेट जगतातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती ठरले आहेत. ते आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष देखील आहेत.

शक्तीशाली व्यक्तींच्या बाबतीत जय शाह यांनी भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीला मागं टाकलं आहे. नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे, ज्यामध्ये शक्तीशाली व्यक्तींची नावं समोर आली आहेत.

यामध्ये भारतातील १०० शक्तिशाली व्यक्तींची नावं नमूद करण्यात आली आहेत. क्रिकेट जगताच्या यादीत जय शाह पहिल्या क्रमांकावर आहेत. कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि नीरज चोप्रा यांचाही समावेश आहे.

'इंडियन एक्सप्रेस' या वृत्तसंस्थेने 'पॉवरफुल इंडियन्स 2024' च्या नावाने एक यादी जारी केली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. तर क्रिकेट जगतात बीसीसीआयचे सचिव जय शाह हे अव्वल स्थानावर आहेत.

संपूर्ण यादीत जय शाह हे ३५ व्या स्थानी आहेत. खरं तर ते आशियाई क्रिकेट परिषदेचे सर्वात तरूण अध्यक्ष आहेत. क्रिकेट विश्वाबद्दल भाष्य करायचे झाले तर, जय शाह यांच्यानंतर विराट कोहलीचा नंबर लागतो.

शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत विराट कोहली ३८व्या क्रमांकावर आहे. कोहली हा भारतीय क्रिकेटचा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. त्याचे सोशल मीडियावर कोट्यवधी चाहते आहेत.

जय शाह आणि विराट कोहली यांच्यानंतर क्रीडा जगतातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून नीरज चोप्राचा नंबर लागतो. तो संपूर्ण यादीत ४६ व्या क्रमांकावर आहे.

नीरज चोप्राने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे. नीरजनंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा नंबर लागतो. धोनी संपूर्ण यादीत ५८ व्या स्थानावर आहे.

धोनीने मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक आयपीएलचा किताब जिंकून दिला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असताना भारतीय संघाला सर्वाधित तीनवेळा आयसीसी ट्रॉफी जिंकवून दिली.