WTC points table : भारतानं सेंच्युरियनवर इतिहास घडवला, पण १८ गुण कमी असूनही पाकिस्तान वरचढ ठरला; २०२१चा शेवट विचित्र झाला

IND beat SA 1st Test: भारतीय संघानं सेंच्युरियनवर गुरुवारी इतिहास घडवला. सेंच्युरियनवरील हा भारताचाच नव्हे तर आशियाई देशातील संघाचा पहिलाच विजय ठरला.

लोकेश राहुल ( १२३), मयांक अग्रवाल ( ६०), अजिंक्य रहाणे ( ४८) व विराट ( ३५) यांच्या खेळीच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात ३२७ धावा उभ्या केल्या. लुंगी एनगिडीनं ६, तर कागिसो रबाडानं ३ विकेट्स घेतल्या. पावसामुळे कसोटीचा एक दिवस वाया गेला.

प्रत्युत्तरात आफ्रिकेकडून टेंबा बवुमा ( ५२) वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले अन् त्यांचा पहिला डाव १९७ धावांवर गुंडाळला. मोहम्मद शमीनं पाच विकेट्स घेतल्या. भारतानं दुसऱ्या डावात १७४ धावाच केल्या. रबाडा व मार्को जॅन्सेन यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.

भारतानं ठेवलेल्या ३०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार डीन एल्गरनं ( ७७) संघर्ष केला, परंतु तो बाद होताच आफ्रिकेचा डाव १९१ धावांवर गडगडला. जसप्रीत बुमराह व शमी यांनी प्रत्येकी ३ , तर मोहम्मद सिराज व आर अश्विन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

भारतानं ११३ धावांनी हा सामना जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC ) गुणतालिकेत खात्यात १२ गुणांची भर घातली. भारतीय संघ ५४ गुणांसह आता WTC Point Table मध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. पण, त्याचवेळी ३६ गुण असलेला पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

गुणतालिकेत भारताच्या खात्यात सर्वाधिक गुण दिसत असले तरी भारताची विजयाची टक्केवारी ही ६४.२८ इतकी आहे. भारताची ही WTC मधील तिसरी मालिका आहे आणि त्यात त्यांनी ४ सामन्यांत विजय मिळवले आहेत, तर १ सामना गमावला आहे आणि २ अनिर्णित निकाल लागले आहेत.

पाकिस्तानची विजयाची टक्केवारी ही ७५ इतकी असल्यानं कमी गुण असूनही ते आघाडीवर आहेत. ऑस्ट्रेलिया ३६ गुणांसह अव्वल स्थानावर आहेत ( १०० %) , तर श्रीलंका २४ गुणांसह ( १०० %) दुसऱ्या क्रमांकावर आहेत.