IND vs AUS 2nd ODI Live : टीम इंडियाचे वस्त्रहरण! नावावर नोंदवले गेले नको नकोसे विक्रम; ऑस्ट्रेलियाचे पराक्रम

India vs Australia 2nd ODI Live Update : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे वस्त्रहरण केले. ऑस्ट्रेलियाने १० विकेट्स व २३४ चेंडू राखून हा सामना जिंकताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.

मिचेल स्टार्क, सीन एबॉट व नॅथन एलिस या जलदगती गोलंदाजांनी भारताला २६ षटकांत ऑल आऊट केले. त्यानंतर मिचेल मार्श व ट्रॅव्हिस हेड यांनी भारतीय गोलंदाजांना धू धू धुतले आणि ११ षटकांत विजय मिळवून दिला.

भारताच्या ११७ धावांचा पाठलाग करताना मिचेल मार्श सामना लवकर संपवण्याच्या प्रयत्नात दिसला. ट्रॅव्हिस हेड ३० चेंडूंत १० चौकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला, तर मार्शने ३५ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ६६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ११ षटकांत बिनबाद १२१ धावा करून सामना जिंकला.

विशाखापट्टणम येथील ११७ धावा ही भारताची घरच्या मैदानवरील चौथी निचांक धावसंख्या ठरली. यापूर्वी १९८६ मध्ये कानपूर सामन्यात श्रीलंकेने ७८ धावांत ऑल आऊट केले होते. त्यानंतर १९९३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अहमदाबाद येथे १०० धावांत आणि २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध धर्मशाला येथे ११२ धावांत भारताचा डाव गडगडला होता.

२३४ चेंडू राखून ऑस्ट्रेलियाने मिळवेला विजय हा भारताविरुद्धचा कोणत्याही संघाने मिळवलेला मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी २०१९मध्ये न्यूझीलंडने हॅमिल्टन येथे भारतावर २१२ चेंडू राखून विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाचा हा तिसरा सर्वात मोठा विजय ठरला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची भारताची ही तिसरी निचांक धावसंख्या ठरली. १९८१ मध्ये ऑस्ट्रेलियाने सिडनी येथे ६३ धावांत भारताला गुंडाळले होते. २००० मध्ये सिडनी येथेच १०० धावांवर भारत ऑल आऊट झाला होता. २००७मध्ये वडोदरा येथे भारत १४८ धावांवर ऑल आऊट झाला होता.

२६ षटकांत भारताचा डाव गडगडणे ही वन डे क्रिकेटमधील पाचवी सर्वात लहान इनिंग ठरली आणि भारताची घरच्या मैदानावरील दुसरी लहान इनिंग ठरली. यापूर्वी १९८६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताचा डाव २४.१ षटकांत गडगडला होता.

भारताच्या ११७ धावांमध्ये चार फलंदाज शून्यावर माघारी परतले. यापूर्वी वन डे क्रिकेटमध्ये भारतीय संघातील चार फलंदाज पाचवेळा शून्यावर बाद झाले होते. २०१७नंतर प्रथमच भारतावर ही नामुष्की ओढावली.