WTC Final Qualification Scenario : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारताची सुरुवात काही खास झाली नव्हती आणि पहिल्याच दिवशी १०९ धावांवर ते गडगडले. पण, भारताने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला १९७ धावांत गुंडाळले आणि त्यांना केवळ 88 धावांची आघाडी घेता आली.
इंदूर कसोटी सामना भारताच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. भारतीय संघाने हा सामना जिंकला, तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत ते प्रवेश करतील. या सामन्यात पराभव झाल्यास भारताची अंतिम फेरी गाठण्याची प्रतीक्षा थोडी वाढू शकते. इंदूर कसोटीत पराभव झाल्यास, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला अहमदाबाद कसोटी सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली किंवा २-२ अशी बरोबरीत सुटली तर भारताला न्यूझीलंड-श्रीलंका मालिकेतील निकालावर अवलंबून राहावे लागेल. अशा स्थितीत श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांपैकी किमान एक तरी सामना हरावा, अशी प्रार्थना भारताला करावी लागेल. न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध, तेही मायदेशात जिंकणे श्रीलंकेसाठी खूप कठीण असेल.
ऑस्ट्रेलियासाठीही हे समीकरण स्पष्ट आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहज पोहोचण्यासाठी त्यांना भारताविरुद्धच्या दोन सामन्यांपैकी किमान एकात पराभव टाळावा लागेल. म्हणजेच ऑस्ट्रेलियाने ०-३ किंवा १-३ ने मालिका गमावली तरी ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. जर ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामने गमावले, तर त्यांनाही श्रीलंकेच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ जूनपासून ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. भारताची दुसऱ्या डावातही सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली हे आघाडीचे तिन्ही फलंदाज ५४ धावांवर माघारी परतले आहेत आणि अजूनही भारतीय संघ ३२ धावांनी पिछाडीवर आहे.