स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत अडीच दिवसात भारतावर विजय मिळवण्याचा पराक्रम केला. पहिल्या दोन कसोटींत हार पत्करलेला ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कमबॅक करताना ९ विकेट्सने इंदूर कसोटी जिंकून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत १-२ अशी पिछाडी कमी केली. भारताचे ७६ धावांचे लक्ष्य ऑसींनी सहज पार केले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय रोहित शर्माने घेतला, परंतु त्याच्या या निर्णयाला फलंदाज न्याय देऊ शकले नाहीत. मॅथ्यू कुहनेमनच्या फिरकीसमोर ते ढेपाळले. लोकेश राहुलच्या जागी संघात स्थान मिळालेल्या शुभमन गिलने दोन्ही डावांत अपयशाचा पाढा वाचला. श्रेयस अय्यरचे अपयश हे भारतासाठी डोकेदुखी ठरतेय.
भारतीय फलंदाजांची चुकीचे फटके मारण्याचा मोह आवरला असता तर निकाल काही वेगळा लागला असता. विराट कोहलीने दुसऱ्या डावात जेव्हा संघाला सर्वात जास्त गरज होती तेव्हा घाई केली आणि नको तो फटका मारण्यासाठी गेला. परिणामी त्याला विकेट गमवावी लागली.
स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास अधिक उंचावलेला दिसला. अनुभवी स्मिथने गोलंदाजांचा सुरेख वापर करून घेतला आणि अचूक रणनिती आखताना फिल्ड प्लेसमेंटही सुरेख ठेवले त्यामुळेच भारतीय फलंदाजांवर दडपण निर्माण होते गेले.
रवींद्र जडेजाचे नो बॉल भारताला महागात पडले. रवी शास्त्री आणि सुनील गावस्कर यांनीही त्यावरून जोरदार टीका केली. आर अश्विनने प्रभाव पाडला, परंतु त्याचा योग्य वापर या सामन्यात करून घेतला असे जाणवले नाही. उलट स्मिथने नॅथन लाएनचा चांगला वापर करून घेतला. अक्षर पटेल प्रभावहिन दिसला.
फिरकीसाठी पोषक खेळपट्टी असूनही भारतीय फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. चेतेश्वर पुजारा वगळल्यास रोहित, विराट, गिल, अय्यर, जडेजा, अक्षर यांनी निराश केले.