Rohit Sharma Ravi Shastri, IND vs AUS 4th test: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अनेकदा स्पष्टपणे टीकेला उत्तर देताना दिसतो. अहमदाबाद कसोटीपूर्वीही त्याने असाच काहीसा प्रकार केला. Team India चा कर्णधार रोहितने माजी प्रशिक्षक व समालोचक रवी शास्त्रींच्या विधानाला थेट केराची टोपली दाखवली.
भारतीय संघाने पहिले दोन कसोटी सामने तीन दिवसांत जिंकले. या दोन्ही सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाला पळता भुई थोडी केली. तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन स्पिनर्सने तेच भारतीय गोलंदाजांसोबत केले.
भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीत फिरकीला मदत मिळणाऱ्या पिचवर तोंडघशी पडावे लागले. Steve Smith च्या हंगामी नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन स्पिनर्सने भारतीय फलंदाजांचा डाव उधळला नि सामना सहज जिंकला. भारताच्या या पराभवानंतर रवी शास्त्रींनी 'रोहित अँड कंपनी'ला सुनावलं होतं. त्यावर रोहित चांगलाच संतापला असून त्याने शास्त्री गुरूजींना रोखठोक उत्तर दिले आहे.
टीम इंडियाचा अतिआत्मविश्वास त्यांना नडला. अतिआत्मविश्वासामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंदूर कसोटी सामना हरला, असे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले होते. भारतीय संघ दोन विजयानंतर थोडासा आत्मसंतुष्ट आणि समाधानी वाटला. त्यांच्या अतिआत्मविश्वास होता. त्यांनी अनेक गोष्टी गृहीतच धरल्या होत्या, त्यामुळेच रोहितची टीम इंडिया पराभूत झाल्याचे शास्त्री म्हणाले होते.
चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी या टीकेला उत्तर देताना रोहित म्हणाला, 'खर सांगायचं तर, जेव्हा तुम्ही दोन सामने जिंकता तेव्हा बाहेरच्या लोकांना वाटतं की तुमच्या अतिआत्मविश्वास आहे किंवा यशामुळे तुमच्या डोक्यात हवा गेली आहे. पण मला वाटतं की असे दावे करणं म्हणजे पूर्णपणे मूर्खपणा आहे, कारण तुम्हाला केवळ दोनच सामन्यात जिंकायचं नसतं तर चारही सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करायची असते.'
'दोन सामने जिंकले म्हणजे बास... असं कधीच नसतं. एक जिंकणं सुरू झालं की थांबायचं नाही असाच प्रत्येक संघाचा प्रयत्न असतो. जेव्हा लोक अतिआत्मविश्वासाबद्दल बोलतात आणि विशेषत: जेव्हा ते ड्रेसिंग रूमचा भाग नसतात तेव्हा त्यांना ड्रेसिंग रूममध्ये कोणत्या प्रकारची चर्चा झाली हे माहिती नसते. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीला आमच्याबद्दल अतिआत्मविश्वास किंवा तसं काही वाटत असेल, तर आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही', अशा शब्दांत रोहितने शास्त्रींच्या विधानाचा जोरदार समाचार घेतला.